सिन्नर परिसरात अपघाताचे सत्र सुरुच असून सलग तिसऱ्या दिवशी अपघाताची मालिका सुरू राहिली. रविवारी दुपारी सिन्नर – शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर वावी गावाजवळ इनोव्हा कारची मोटारसायकलला पाठीमागून धडक बसल्याने माय-लेकाचा मृत्यू झाला.
वावी गावाजवळ माळवाडी फाट्यालगत असणाऱ्या साई शर्वरी लॉन्ससमोर सिन्नरहून शिर्डीकडे भरधाव जाणाऱ्या इनोव्हा कारची दुचाकी ला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील सुवर्णा कुलकर्णी (७० ) आणि त्यांचा मुलगा वैभव कुलकर्णी (३६) दोघेही राहणार हनुमान वाडी यांचा जागीच मृत्यू झाला. लॉन्स शेजारी असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून दुचाकीने ते वावी फुलेनगर परिसरातील आपल्या शेतीवर कामासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर वावी पोलिसांनी इनोव्हा कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.