नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वृध्द आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा मिळणार असून त्यासाठी प्रत्येक मतदार संघात खास पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या वृध्द आणि अपंग मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा लोकसभा निवडणुकीत प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहे. मध्यंतरी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ही सुविधा देण्यात आली होती. एरवी निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी आणि सैन्य दलातील मतदारांना टपाली मतदान करता येते. नव्याने समाविष्ट झालेल्या घटकांना ही सुविधा वैकल्पिक स्वरुपाची आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) वृध्द आणि अपंग मतदारांना घरी १२ ड अर्जांचे वितरण केले जाणार असल्याचे नाशिकचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. जे मतदार घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडतील, त्यांना या सुविधेचा लाभ देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

हेही वाचा…नाशिक : सी व्हिजिल ॲपवर पहिली तक्रार, ६० मिनिटांत निपटारा; भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनावर कारवाई

या नव्या पध्दतीच्या मतदानासाठी पाच जणांचा समावेश असणारे एक यानुसार पथकांची स्थापना केली जाईल. प्रत्येक पथकात मतदान केंद्राध्यक्ष दर्जाचा अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, मदतनीस, पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती यांचा समावेश असणार आहे. यावेळी उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. ‘१२ ड’ अर्जाद्वारे टपाली मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या मतदाराच्या घरी हे पथक जाईल. घरातच मतदान केंद्रासदृश रचना करण्यात येईल. मतपत्रिकेवर संबंधिताने मत नोंदविल्यानंतर मतपत्रिकेची नियमानुसार घडी घालून ती पाकिटबंद केली जाईल. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या तीन दिवस आधीच घरबसल्या मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर दोन दिवसांत कागदी मतपत्रिका तयार होते. त्यानंतर प्रत्येक मतदार संघात घरबसल्या मतदानास सुरुवात होईल.

हेही वाचा…वागदर्डीतील मृतसाठाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर; मनमाडकरांची पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे

नाशिक जिल्ह्यात ८५ वर्षावरील ६४ हजार ७५७ वृध्द तर २३ हजार ४३४ अपंग असे एकूण ८८ हजार १९१ मतदार आहेत. यापैकी किती मतदार घरबसल्या मतदानासाठी अर्ज करतात, त्यावर या प्रक्रियेसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या पथकांची संख्या अवलंबून असेल. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. याच्या तीन दिवस आधी टपाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – शशिकांत मंगरुळे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to election commission order in nashik voting arrangements at home for elderly and disabled voters in lok sabha election psg