कुंभमेळ्याच्या धामधुमीनंतर महापालिका पुन्हा एकदा सक्रिय झाली असून शुक्रवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने पश्चिम विभागातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे जमीनदोस्त केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कुंभमेळ्याआधी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील अनधिकृत झोपडपट्टी, बांधकामे या विरोधात धडक मोहीम राबविली होती. यामुळे शहराने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली असताना नंतरच्या काळात ही मोहीम थंडावली. परंतु मागील काही दिवसांत हा विभाग पुन्हा कार्यरत झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी नाशिक पश्चिम विभागात पथकाने कारवाई केली. उच्चभ्रू वसाहतीतील विनायका पार्क, हं. प्रा. ठा. महाविद्यालयाच्या मागील बाजूला, इमारतीतील टेरेसच्या जागेतील व सामायिक अंतरातील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. अनधिकृत बांधकामे, वाहनतळ, सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांनी आपली अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

Story img Loader