वन्यजीवांच्या शिंगासह इतर अवयवांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या पंचवटीतील दुकानदाराविरुध्द वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- नाशिक : आदिवासी विकासच्या आजपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
अंधश्रध्देमुळे काही धार्मिक विधी तसेच अन्य काही कारणांसाठी जनावरांचे कातडे, शिंगे तसेच इतर अवयव वापरले जातात. पंचवटी तसेच रविवार कारंजा परिसरात याआधीही अवैधरित्या अशा काही वस्तुंची विक्री होत असल्याचे प्रकार वनविभागाने केलेल्या कारवाईत उघड झाले होते. पंचवटीत धनेश टेकम हा समुद्र प्राणी, वन्यजीवांची शिंगे, वन्यप्राण्यांचे नखे अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर फिरत्या पथकाने खातरजमा केली. टेकम याच्या दुकानावर छापा टाकला असता जनावरांची शिंगे तसेच अन्य अवयव आढळून आले. संशयित टेकम याला पुढील चौकशीसाठी उपनवसंरक्षक पंकज गर्ग आणि विभागीय वनअधिकारी विशाल माळी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सहायक वनसंरक्षक झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे हे या संदर्भातील पुढील कारवाई करीत आहेत.