लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : महानगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेंतर्गत सलग चौथ्या दिवशी गोविंदनगर, लेखानगर, कालिकामंदिर आणि द्वारका परिसरातील १५ ते २० अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. मुख्यत्वे गच्चीवर थाटलेल्या अनधिकृत हॉटेलांवरही कारवाई केली जात आहे.

उपरोक्त भागात व्यावसायिकांनी सामासिक अंतरातील बांधकाम, गच्चीवरील हॉटेल, दुकानांसमोरील शेड, बाहेरील बाजूस बांधलेले कठडे, ओटे आदी अतिक्रमण पथकाने उद्ध्वस्त केले. दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलक काढून घेण्यात आले. रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले. या मोहिमेत प्रामुख्याने गच्चीवरील अनधिकृत हॉटेलांवर कारवाई केली जात आहे. गोविंदनगर येथील हॉटेल जोजोची गच्चीवरील व्यवस्था आणि सामासिक अंतर, गच्चीवरील हॉटेल रेस्टो बार, काठे गल्लीतील हॉटेल गार्लिक, लेखानगर येथील हॉटेल शॅक, हॉटेल सचिन बार, मुंबई नाका येथील संदीप हॉटेल, कालिका मंदिराजवळील हॅपी टाइम्स आदी हॉटेलांसह आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात आली. परिसरातील छोटी-मोठी अतिक्रमणे काढून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

आणखी वाचा-सरकारी कांदा खरेदीत अनियमितता, नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी

तीन दिवसांपासून कॉलेजरोड आणि गंगापूर रोड परिसरात कारवाई सुरू होती. आता ती शहरात इतरत्र विस्तारत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. मोहीम शहरात यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांसह व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोहिमेचा धसका

शहरात याआधीही अतिक्रमण निर्मूलन मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. परंतु, त्या एक किंवा दोन दिवसांपुरताच मर्यादित राहतात. त्यामुळे यावेळी मोहीम दोन दिवसात आटोपती घेण्यात येईल, असा अनेकांचा समज होता. परंतु, मोहीम त्यानंतरही सुरुच राहिल्याने शहरात इतरत्र अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. काही व्यावसायिक मोहिमेचा धसका घेत स्वत: अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामध्ये हॉटेल संदीप, हॉटेल गोकुळ, हॉटेल रूची, कढी समोसा, माऊली, फळांचे रस विक्रंता यांचा समावेश आहे. संबंधितांनी सामासिक अंतरातील अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on unauthorized constructions including hotels in govindnagar dwarka areas in nashik mrj
Show comments