लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : लष्करातील जवानांचे भत्ते आणि देयकांचे वेळेत वितरण करण्यासाठी येथील संरक्षण विभागाच्या वेतन आणि लेखा, तोफखाना, आर्मी एव्हिएशन विभागातील १५ अधिकाऱ्यांनी संगनमताने गैरमार्गाने आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. संशयितांनी स्वीकारलेल्या लाचेची रक्कम २० हजार ते साडेसात लाख रुपयांपर्यंत आहे.

केंद्रीय अन्वेषणच्या मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रक्षा लेखा महानियंत्रक, वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखा परीक्षक, सहायक लेखा अधिकारी, लिपीक, तोफखाना आणि आर्मी एव्हिएशन विभागातील अधिकारी दावे मंजूर करताना लाच मागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याआधारे विभागाच्या पथकाने दिल्लीतील रक्षा लेखा महानियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये येथील सर्व संबंधित विभागांत अकस्मात तपासणी केली. यात संबंधित अधिकारी-कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विभागाचे उपअधीक्षक रणजितकुमार पांडे यांनी दिली.

स्वत:ची हक्काची रक्कम मिळण्यासाठी संशयितांकडून जवानांकडे आर्थिक लाभाची मागणी केली जात होती. तपासणीत संशयित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीत उभयतांमधील व्यवहार, संभाषणे आढळली. यावरून संशयितांना लाच मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. लाचेची ही रक्कम २० हजार ते साडेसात लाख रुपयांपर्यत आहे. संशयितांमध्ये वेतन आणि लेखा विभागातील सहायक लेखा अधिकारी, लेखापरीक्षक, लिपिकांसह तोफखाना आणि आर्मी एव्हिएशन दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या संशयास्पद व्यवहारांची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे. संबंधित विभागातील सक्षम अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर संशयितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये ११ गुन्हे दाखल करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने संशयिताच्या नाशिक, लखनऊ, अहमदाबाद, नागपूर येथील निवासस्थानांची झडती घेत कागदपत्रे जप्त केली.