नाशिक – शहरातील रिक्षा चालकांची वाढती मुजोरी हा नाशिककर आणि पोलिसांसाठी त्रासदायक विषय होऊ लागला आहे. थांबा सोडून रिक्षा उभी करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, प्रवासी तसेच अन्य वाहनचालकांशी मुजोरी करणे, किरकोळ कारणावरुन मारहाण करणे, थांब्यांवर शहर बससेवेच्या जागेवर रिक्षा उभी करणे, असा मनमानी कारभार सुरू आहे.

शालिमार येथे चारचाकी वाहनधारकास मारहाणीची घटना घडल्यानंतर रिक्षा चालकांच्या बेमूर्वत वागणुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसात एक हजारापेक्षा अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शालिमार येथे धक्का लागल्याच्या कारणावरुन चारचाकी वाहनापुढे रिक्षा आडवी उभी करुन चालकाने वाद घातला.

चारचाकी वाहनचालक आणि वाहनातील महिला गयावया करत असतानाही रिक्षाचालक शिवीगाळ करत राहिला. वाहन चालकाला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेत त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, बेशिस्त रिक्षाचालकांविरुध्द वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विनानंबर रिक्षा चालविणे, गणवेश परिधान न करणे, अशा वेगवेगळ्या कारणांनुसार कारवाई करण्यात आली. तीन दिवसात एक हजार २६६ रिक्षाचालकांविरुध्द कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.