लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: प्रादेशिक परिवहन विभागाने एक जुलैपासून राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एक हजार ९४ खासगी प्रवासी बसची तपासणी होऊन त्यात ४३७ वाहने दोषी आढळली आहेत. या वाहनधारकांवर १७ लाखहून अधिकची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मद्यसेवन करून अवजड वाहतूक केल्या प्रकरणी चार वाहनचालकांचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशान्वये एक ते ३१ जुलै या कालावधीत खासगी प्रवासी बसची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्याची तपासणी, वेग नियंत्रकात छेडछाड, अग्निशमन यंत्रणा, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अवैधरित्या टप्पा वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बस, वाहनात बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजांची स्थिती, योग्यता प्रमाणपत्र, जादा भाडे आकारणी व रिफ्लेक्टर, इंडिकेटर, मागील दिवे, वायपर आदींची मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांनुसार तपासणी करण्यात आली.
हेही वाचा… मालेगाव तालुक्यात प्रधानमंत्री पीक विमा प्रचारासाठी रथ
आरटीओच्या पथकांनी आतापर्यंत १०९४ वाहनांची तपासणी केली. त्यापैकी ४३७ वाहनांमध्ये वेगवेगळ्या बाबींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले. या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १७ लाख आठ हजार रुपये दंड आणि कर वसूल करण्यात आल्याचे या विभागाने म्हटले आहे. तसेच १६ वाहने ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयात आणून ठेवण्यात आली.
मद्यपी चालकांचा वाहतूक परवाना निलंबित
बोरगाव सीमा तपासणी नाका येथे परराज्यातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी मद्य सेवन केले आहे की नाही, याची चाचणी केली जाते. या तपासणीत चार अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे.