पर्जन्यमान तपासणी प्रशिक्षण कार्यशाळेत निर्देश
दुष्काळी स्थितीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तहसील स्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले असून या दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम दिले जाणार नाही.
तलाठी, ग्रामसेवकांच्या साप्ताहिक बैठकांद्वारे परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. जूनअखेपर्यंत पाणी उपलब्ध राहील असे पाण्याचे स्त्रोत शोधणे, टंचाईची माहिती घेऊन चारा छावणीचे प्रस्ताव पाठविणे, पाण्याच्या स्त्रोताची आणि टँकरद्वारे वितरित होणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची नियमित तपासणी करणे, स्त्रोताच्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा उपयोग आदींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासन आणि मुंबईचे प्रादेशिक हवामान केंद्र यांच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘आगामी मान्सून आणि पर्जन्यमापन तपासणी प्रशिक्षण’ कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा झाली. पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचे निर्देश उपायुक्त दिलीप स्वामी यांनी दिले. चारा टंचाईची माहिती घेऊन आवश्यकता असल्यास चारा छावणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावेत. त्याबाबत कृषी, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी दैनंदिन संपर्क ठेवावा. पाण्याच्या स्त्रोताची आणि टँकरद्वारे वितरीत होणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची नियमित तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले. तर मोसमी हवामानाच्या प्रदेशात कमी किंवा अधिक पर्जन्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सातत्याने यशस्वीपणे तोंड द्यावे लागते. अशा आव्हानांना सामोरे जाताना पर्जन्याचे अचूक मोजमाप महत्वाचे ठरते, असे विभागीय आयुक्त राजाराम माने म्हणाले.
भारतीय हवामान विभागाचे उपमहानिरीक्षक कृष्णानंद होसाळीकर, उपायुक्त दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, वैज्ञानिक शुभांगी भूते, तहसीलदार बबन काकडे यावेळी उपस्थित होते.
हवामान विभागाकडे दीडशे वर्षांच्या नोंदी
हवामान विभागाकडे १५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या हवामानाच्या नोंदी असून या वर्षी साधारणत: सरासरीच्या जवळ असणारा पाऊस असेल, असा पहिल्या टप्प्यातील अंदाज आहे. हवामान विभागाने प्राप्त माहितीचे अचूक विश्लेषण केल्याने ‘फनी’ वादळाची पूर्वसूचना योग्यवेळी देणे शक्य झाले. पारंपरिक पद्धतीच्या पर्जन्यमापकाच्या नोंदींचे जगभर महत्त्व असून येत्या काळातही योग्य माहितीसाठी याच पर्जन्यमापकाचा उपयोग होणार असल्याचे कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.