लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: दूध व दुग्धजन्य पदार्थांत होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीतर्फे धडक कारवाई मोहीम राबवित चाळीसगावातील आठ डेअऱ्यांतील भेसळयुक्त दूध नष्ट करुन चार डेअरी आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तसेच एरंडोलमध्ये २२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करीत वजनमापे विभागातर्फे खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली.
१५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध डेअरी आस्थापनांवर दूध भेसळ व वजनमापनाचे खटले दाखल करण्यात आले आहेत. समितीमार्फत चाळीसगाव येथे आठ डेअर्यांच्या तपासणीअंती भेसळयुक्त दूध नष्ट केले असून, चार डेअरी आस्थापनांवर वजनमापे विभागाने खटले दाखल केले आहेत.
हेही वाचा… दरोड्यापूर्वीच पाच संशयित जाळ्यात; धरणगावातील गस्ती पथकाची कारवाई
गोठ्यात अनधिकृत ऑक्सिटोसीनचा वापर आढळल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत नशिराबाद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल येथे तीन वजनमाप खटले दाखल करण्यात आले असून, २२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करून, दोन नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.