लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे यासारख्या वाईट हेतूने सातपूर परिसरात सात कैऱ्या आणि सात दगडांची रस्त्याच्या कडेला रचना करुन अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांचा डाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पध्दतीने उधळून लावला. पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कैऱ्यांचा उपयोग अशा कामांसाठी नव्हे तर, खाण्यासाठीच करावा, असा संदेश देत त्यांचा स्वत: आस्वाद घेतला. या पूजेमुळे भयभीत झालेल्या परिसरातील रहिवाशांना अशाप्रकारच्या कृती या अंधश्रद्धा असून, त्यास कोणीही बळी पडू नये, असे प्रबोधन अंनिसने केले.
सातपूरमधील सोमेश्वर कॉलनीत चारचाकी वाहने उभे करण्याच्या ठिकाणी पानांवर सात कैऱ्या आणि दगड ठेवून त्यावर हळद-कुंकु टाकलेले तसेच नैवेद्य ठेवण्यात आल्याचे बुधवारी सकाळी दिसून आले. अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी, यामागचा नेमका हेतू काय, करणीचा तर हा प्रकार नसावा ना, असे अनेक प्रश्न रहिवाशांमध्ये उपस्थित झाले. काहींनी ही पूजा काळ्या जादूचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. रहिवाशांना त्याठिकाणी वाहने उभे करणेही टाळले. या सर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आणखी वाचा- जळगाव तालुक्यात शेतकर्यावर बिबट्याचा हल्ला; गाईचाही पाडला फडशा
परिसरातील रहिवाशांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशा प्रकारच्या उताऱ्यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी पटवून दिले. तसेच उताऱ्यात मांडलेल्या कैऱ्या धुवून त्यांचा आस्वाद घेतला. नागरिकांनी अशाप्रकारच्या पूजांमुळे घाबरून जावू नये, परिसरात अंधश्रद्धाचा प्रकार घडत असेल तर अंनिसशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. दरम्यान, अशाप्रकारची पूजा करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांचा परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.
यशदाचे कौतुक
अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये लहानग्या यशदाचे सर्वांनीच कौतुक केले. यशदाने मनात कुठलीही भीती न बाळगता पूजेतील कैऱ्या उचलल्या. तसेच त्यांचा आस्वादही घेतला. अशा प्रकारच्या उताऱ्यामुळे विघ्न दूर होणे किंवा इतरांना त्यापासून इजा पोहोचणे ही निव्वळ अंधश्रद्धा असल्याचा संदेशही तिने यावेळी दिला.