देवळा तालुक्यातील वाजगाव माध्यमिक आश्रमशाळेतील उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : शालेय पोषण आहार आणि कुपोषण या प्रश्नांकडे राजकीय भांडवल म्हणून बऱ्याचदा पाहिले जाते. या दोन वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पर्यावरण सेवा योजना विभागाने पुढाकार घेतला आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्र येत शाळेच्या आवारातच परसबाग लावली आहे. या माध्यमातून पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला शाळेच्या आवारातच मुलांना मिळत आहे. मात्र पाण्याअभावी हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे.

वाजगाव येथील निवासी आश्रमशाळेतील स्वयंपाकासाठी तसेच पोषण आहारासाठी बाहेरून भाजीपाला आणला जात होता. त्यामध्ये पालेभाज्या क्वचितच मिळायच्या. त्यासाठी होणारा खर्च पाहता पालेभाज्यांसह अन्य काही पौष्टिक भाज्या शाळेच्या आवारातच मिळाव्यात यासाठी पर्यावरण सेवा योजना विभागाच्या सहकार्याने आश्रमशाळेतील ५० विद्यार्थ्यांसोबत परसबाग उपक्रमांची आखणी झाली. योजना प्रमुख पी. बी. विशी (अधीक्षक), सहायक अधीक्षक देवरे यांनी कामास सुरुवात केली.

शाळेच्या आवारातच जमीन नांगरत या ठिकाणी शाळेने तयार केलेले सेंद्रिय खत टाकण्यात आले. वाफे तयार करण्यात आले. शाळेच्या कूपनलिकेचे पाणी आणि काही सांडपाण्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. कूपनलिकेपासून जलवाहिनी घेत परसबागेला पाणी मिळेल अशी व्यवस्था विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली. विद्यार्थी या ठिकाणी निवासी असल्याने पहाटे तसेच सायंकाळी शाळा सुटल्यावर श्रमदानासाठी वेळ देत होते. विद्यार्थ्यांंनी शिक्षकांच्या मदतीने बियांची टोचण पद्धतीने लागवड केली. यामध्ये काही गावठी वाण तर काही संकरीत वाण लावण्यात आले. वाण लागवड करतानाच पौष्टिकतेचा आग्रह धरीत रासायनिक खतांचा वापर न करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला. यामध्ये त्यांनी वाफ्यात मेथी, शेपू, पालक, गवार, भेंडी, मुळा, गिलके, दोडके, वाल पापडी, भोपळा, कोथिंबीर, वांगे, कारले, डांगर याची लागवड केली. परसबागेमुळे विद्यार्थ्यांना रोजच्या रोज मुबलक स्वरूपात भाजीपाला उपलब्ध होऊ लागला.

दुसरीकडे, शाळेच्या खर्चातही बचत होत असल्याने या निधीचा वापर विद्यार्थ्यांच्या अन्य गरजा पुरविण्यासाठी करण्यात येणार आहे. सध्या दुष्काळसदृश स्थिती असल्याने पाण्याअभावी प्रकल्प अडचणीत आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांत जलपुनर्भरण प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवीत परसबाग शाळेच्या आवारात व्यवस्थित कशी सुरू राहील, यासाठी प्रयत्न होणार असल्याचे विशी यांनी सांगितले.

ग्रामस्थांसाठी लवकरच कार्यशाळा

‘परसबाग’ उपक्रमामुळे  विद्यार्थ्यांंना आवडीची आणि रोज ताजी भाजी मिळते. त्यातून विद्यार्थ्यांंना पोषण आहार मिळण्यास मदत झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान पालेभाज्या बाजारात महाग होत्या. उलटपक्षी शाळेत विद्यार्थ्यांंनी लागवड केलेल्या परसबागेतून भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ  शकला. ज्यातून शाळेचा आर्थिक फायदा झाला. भविष्यात जास्त प्रमाणात जर भाजीपाल्याचे उत्पन्न वाढले, तर त्याची परिसरातील अन्य ग्रामस्थांना विक्री करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्याचा मानस आहे.

-जगदीश ठाकूर (पर्यावरण सेवा योजना, प्रकल्प अधिकारी)