अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उद्घाटन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : सह्य़ाद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देवराई प्रकल्पाचे उद्घाटन १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्याच हस्ते आणि महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याशिवाय सर्व विभागात देवराई अंतर्गत वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने शिंदे हे वृक्षप्रेमींशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडे, महापालिकेच्यावतीने २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित पुष्प महोत्सवात विविध पुष्प, वृक्ष, फळे, भाजीपाला यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते होईल.

या उपक्रमांची माहिती महापौर रंजना भानसी, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. देवराई लागवडीत वृक्षप्रेमींनी सहभागी होऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन उभयतांनी केले. शिंदे यांच्या संकल्पनेनुसार महापालिका क्षेत्रात देवराई लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई नाका येथील गायकवाडनगर येथे होणार आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी शिंदे आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन नाशिक विभागात सराफनगर, वडाळा-पाथर्डी रोड, इंदिरानगर, सातपूर विभागात इशांत हाइट्स, प्रभाग क्रमांक नऊ, संभाजी व्यायामशाळा, पंचवटी विभागात हिरावाडी, तांबोळीनगर, नाशिकरोड विभागात जेलरोड व्यापारी बँक मागील मोकळी जागा, इंगळेनगर, जेलरोड, नाशिक पूर्व विभागात आदर्श सोसायटी आणि इंदिनगर येथे हे कार्यक्रम होतील.

पालिका मुख्यालय फुलांची बहरणार

महापालिकेच्या पुष्पोत्सवात विविध गटात स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. गुलाब पुष्पे, कृत्रिम आच्छादनातील वाढलेली गुलाब पुष्पे, मोसमी, बहुवर्षीय फुले, कुंडीतील शोभा वनस्पती, पुष्परचना, फळे-भाजीपाला, कुंडय़ांची सजावट अशा स्पर्धा होतील. त्यातील विजेत्यांना विविध उद्योजकांनी पुरस्कृत केलेली गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार, फुलांच्या प्रांगणातील सर्वोत्कृष्ट पुष्पे, सर्वोत्तम शोभा वनस्पती, सर्वोत्तम पुष्परचना, सर्वोत्तम परिसर प्रतिकृती आणि तबक उद्यान आदी पारितोषिके दिली जातील. पुष्पोत्सवाच्या काळात महापालिकेचा परिसर वेगवेगळी पुष्प, शोभीवंत झाडांनी बहरणार आहे. प्रवेशद्वारावर नर्सरीचे कक्ष असतील. मुख्यालयात गुलाब पुष्पे, पुष्परचना, शोभिवंत झाडे, फळे आणि भाजीपाला, बोन्साय, कॅक्ट्स आदींची मांडणी केली जाईल. स्पर्धामध्ये निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे तसेच प्रदर्शनास नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याच काळात निबंध, कविता, छायाचित्र स्पर्धा होणार आहेत.