नाशिक – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातून ३०० हून अधिक बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही गावातून ४० पेक्षा अधिक जणांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध ठिकाणांहून भाविक जमतात. नाशिक जिल्ह्यातून पंढरपूर येथे जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध आगारांतून दररोज २० जादा बस सोडण्यात येणार आहेत. १३ ते २२ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे होणारी यात्रा, तसेच गुरूपौर्णिमा हा दिवस वारकरी, भाविकांसाठी महत्वाचा असतो. भाविकांची गैरसोय होऊ नये, फुकट्या प्रवाशांना लगाम बसावा, यासाठी महामंडळ यात्रा काळात विशेष लक्ष ठेवून आहे. या काळात होणारी गर्दी लक्षात घेता फुकट्या प्रवाशांकडून तिकीट न काढण्याचा प्रयत्न होतो. महामंडळाच्या बसमधून पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गांवर तपासणी नाके उभारण्यात येणार असून तिकीटांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. महिला व ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या योजना जादा बससेवेसाठीही लागू राहणार असल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.