नाशिक : भारतीय लष्करात अधिकारी घडविणाऱ्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५३ व्या तुकडीसाठीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात शहरातील आदित्य देवरेने संपूर्ण देशात ३४ वा क्रमांक पटकावला.

सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची मुलाखत आदित्यने फेब्रुवारी महिन्यात प्रयागराज येथून उत्तीर्ण केली होती. आदित्यचे शालेय शिक्षण रंगुबाई जुन्नरे हायस्कुलमध्ये तर, बारावीपर्यंतचे शिक्षण के.टी.एच.एम. महाविद्यालयात झाले.

त्याचे वडील विशाल देवरे हे पोलीस दलात गुन्हे शाखेत नाईक पदावर कार्यरत असून आई माधुरी या गृहिणी आहेत. त्याची धाकटी बहीण साक्षी ही रंगुबाई जुन्नरे हायस्कुलमध्ये सातवीत शिकत आहे. दहावीची परीक्षा झाल्यापासून आदित्य सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी विविध परीक्षा व मुलाखतीची तयारी हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली करत होता.

आदित्यची सैन्य अभियांत्रिकी (टीईएस) या मार्गाने सैन्यदल अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाली. सैन्य अभियांत्रिकीचे देशात पुणे, महू आणि सिकंदराबाद या तीन ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. आदित्य जुलै महिन्यात या तीनपैकी एका प्रशिक्षण केंद्रात दाखल होईल.

आणि आपले तीन वर्षांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करेल. त्यानंतर चौथ्या वर्षी तो भारतीय लष्करी प्रबोधिनीतून एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात लेफ्टनंट या अधिकारी पदावर रुजू होईल, अशी माहिती सुदर्शन अकॅडमीचे अहिरराव यांनी दिली.