नाशिक : अनोळखी व्यक्तीशी संवाद करू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वसंरक्षण कशा प्रकारे करता येईल, याचे धडे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींना दिले. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे लोकार्पण शुक्रवारी आदित्य यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वसंरक्षण, आपत्कालीन स्थितीची हाताळणी यावर मार्गदर्शन करण्यात आले. आदित्य यांनी विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. सभागृहात आवाज घुमत असल्याने चर्चेची स्पष्टता, आकलन होण्यात अडथळे आले. मार्गदर्शन सत्रानंतर आदित्य यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी एकच चढाओढ झाली.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शिवसेनेने विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन यावर लक्ष केंद्रित केले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकरोड भागातील क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, सेनेचे संघटक नेते भाऊसाहेब चौधरी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. नामफलकावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रंजना भानसी, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांचाही उल्लेख होता. परंतु, भाजपच्या मंडळींनी या कार्यक्रमास जाणे टाळले. यानिमित्त संकुलाच्या सभागृहात आठ ते दहा शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण, आपत्कालीन परिस्थितीची हाताळणी यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तज्ज्ञांमार्फत प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. लोकार्पण झाल्यानंतर आदित्य हे मार्गदर्शन सत्रात पोहोचले.

सभागृहात मध्यभागी खुले व्यासपीठ होते. आदित्य आणि प्रात्यक्षिक दाखविणारे तज्ज्ञ वगळता तिथे कोणी पदाधिकारी गेले नाही. या व्यासपीठावरून आदित्य यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरे विचारली. आग लागल्यावर कसे संरक्षण करता येईल, या प्रश्नावर विद्यार्थिनींनी उत्तरे दिली. परंतु, सभागृहात आवाज घुमत असल्याने कोण काय बोलत आहे तेच कळत नव्हते.

विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. अपरिचित व्यक्तींशी संवाद साधू नये, असे त्यांनी सूचित केले.

Story img Loader