आगामी महापालिका निवडणुकीचे बिगूल फुंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. विविध कार्यक्रमांद्वारे मतदारांना साद घालण्याचे प्रयत्न केले जात असून पतंग महोत्सवानंतर शिवसेनेने आयोजिलेला ‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम त्याचाच भाग ठरला आहे. दुसरीकडे पक्षनेत्यांना प्रचार यंत्रणेत उतरविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचअंतर्गत सोमवारी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चाचपणी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सर्वच पक्षांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन व तत्सम कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. सोमवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने काही विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले. यामध्ये प्रभाग क्र. २४च्या नगरसेविका कल्पना पांडे व शिवाजी चुंबळे यांनी उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण व उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच म्हसरूळमधील महापालिका प्राथमिक शाळेचे लोकार्पण, पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले यांच्या सिद्धपिंप्री येथील क्रीडा संकुल व आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा तसेच पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. एकाच दिवशी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, तयारीचा आढावा घेतला.
काही निवडक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी आदित्य यांनी संवाद साधला. शहरात शिवसेनेची सद्य:स्थिती काय आहे, प्रत्येक प्रभागाचा अभ्यास करताना सामाजिक व भौगोलिक स्थिती काय, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांनी केलेली तयारी यावर मंथन करत मुंबईच्या धर्तीवर शाखाभेटीचा उपक्रम हाती घेतला गेल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शाखा बळकट करण्यासाठी काय करता येईल याबाबत आवश्यक त्या सूचना करत त्यांनी ‘निवडणूक मंत्र’ कार्यकर्त्यांना दिल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.