नाशिक – महायुती सरकारने मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक महापालिकांची निवडणूक होऊ दिली नाही. प्रशासकाच्या माध्यमातून घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्र लुटायला निघाल्याचा आरोप करतानाच ज्यांनी शहरांना लुटले ते मंत्री आणि अधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कारागृहात टाकले जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा बुधवारी सायंकाळी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाली. यावेळी त्यांनी शिंदे गट, भाजपवर टीकास्त्र सोडताना संबंधितांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमून बटट्याबोळ केल्याचा आरोप केला. मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-नाशिक महामार्गाची भयावह स्थिती असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रस्त्यांची कशी वाट लागली हे एकदा बघायला हवे. शहरातील समस्यांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेत तीन, चार दिवस पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. गरोदर महिलेला १० तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लाठीमारचा आदेश कोणी दिला, असा प्रश्न त्यांनी केला. बदलापूर येथे जनक्षोभ उसळला असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत तर, मुख्यमंत्री शेतावर होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बहिणींना निधी व सुरक्षा दोन्ही दिले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd