बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळ, देवस्थान, नगरपालिका प्रशासन, पोलीस यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे श्रावणात कायमच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. या गर्दीसाठी देवस्थानच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रावणात भाविकांना मंदिराच्या पूर्व दरवाज्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेऊ शकतील. तसेच दर्शन रांगेत ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष, अशा सुविधा करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> सायखेडा ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास न्यायालयात धाव – प्रेमविवाहाची नोंद न करण्यास राईट टू लव्हचा आक्षेप
श्रावण महिन्यात मंदिर उघडण्याची वेळ पहाटे पाच असून रात्री नऊ वाजता मंदिर बंद होईल. प्रत्येक श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे चार ते नऊ या कालावधीत खुले राहील. गावकऱ्यांना दर्शन वेळ मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत राहणार आहे. दर्शनासाठी स्थानिकांकडे रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे. दर्शनासाठी गावकऱ्यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजे जाळी दरवाज्याने प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा आणि देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा या बाजूने राहणार आहे. श्रावणात विशेषत: सोमवारी भाविकांची होणारी गर्दी पाहता महामंडळाच्या वतीने जादा बससेेवेचे नियोजन सुरू असून फेऱ्या वाढवितांना त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील अन्य प्रसिध्द शिवमंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता जादा गाड्या सोडण्यात येतील. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.