कुंभमेळ्यातील प्रमुख शाही पर्वणी वेळी गोदावरी प्रदूषित होऊ नये म्हणून गंगापूर धरणातून पाणी सोडण्यापर्यंत धडपड करणाऱ्या प्रशासनाने पर्वणी पर्व संपल्यानंतर नदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोदावरी प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने शासनाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (निरी) तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सद्य:स्थितीत गोदावरी काठावर फेरफटका मारल्यास ठिकठिकाणी कचरा व शेवाळ साचल्याने पसरलेली दरुगधी, तुटक्या-फुटक्या निर्माल्य कलशामुळे अस्ताव्यस्त पडलेला कचरा, कपडे व वाहन धुण्यासाठी झालेली गर्दी.. अशा प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्याचे दृष्टीपथास पडते. सिंहस्थात साधू-महंत आणि राजकीय पुढाऱ्यांच्या सरबराईत कोणतीही तोशीस न ठेवणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने उपरोक्त सोहळा आटोपल्यानंतर प्रदूषण रोखणे अथवा नदीच्या स्वच्छतेशी आपला जणू संबंध नसल्यासारखी भूमिका स्वीकारली आहे.
गोदावरी नदीचे प्रदूषण हा मागील चार ते पाच वर्षांपासून ऐरणीवर आलेला विषय आहे. यावर उपाय केले जात नसल्याने गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. ज्या गोदावरीत देशभरातील लाखो भाविक कुंभमेळ्यात शाही स्नान करणार आहेत, ती तत्पूर्वी प्रदूषणमुक्त करावी अशी मागणी संबंधितांनी केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने विविध सूचना करत त्यांची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा, पालिका व पोलीस प्रशासनावर सोपविली. त्यात स्थानिकांकडून नदीपात्रात कचरा टाकला जाऊ नये म्हणून उपाययोजना करणे, निर्माल्य संकलित करण्यासाठी काठावर ठिकठिकाणी कलश ठेवणे, मोहिमेद्वारे नदीपात्राची स्वच्छता, वाहन व कपडे धुण्यास प्रतिबंध करणे आणि नियम न पाळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करणे आदींचा समावेश होता. सिंहस्थासाठी काही प्रमाणात यंत्रणांनी हातपाय मारले. शाही पर्वणी वेळी प्रदूषण कमी करण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचाही मार्ग अनुसरला. कुंभमेळ्यातील तिन्ही पर्वण्या झाल्यानंतर प्रशासनाने गोदावरी स्वच्छतेच्या विषय अक्षरश: वाऱ्यावर सोडून दिल्याचे सध्याचे चित्र आहे.
ही अनास्था सिंहस्थानंतर गोदावरी प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठण्यास कारक ठरली. रामकुंड ते कन्नमवार पुलापर्यंतचे गोदापात्र अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. कन्नमवार पुलालगतच्या नवीन घाटांवर सर्वत्र कचरा असून ठिकठिकाणी मातीचे ढीग आहेत. काही ठिकाणी पात्राची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. पाण्यात कोणी निर्माल्य टाकू नये म्हणून ठेवलेले निर्माल्य कलश तुटले आहेत. परिणामी, कलशाच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात कचरा पडलेला दिसतो. शाही पर्वणी झाल्यावर पात्रात पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे पात्राची डबक्यासारखी अवस्था झाली आहे. या ठिकाणी महिलांची कपडे धुण्यासाठी गर्दी असते.
दिवाळीमुळे कपडे धुणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. वाहने धुणाऱ्यांची लगबग आहे. काही महिन्यांपूर्वी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात होती. मात्र, कित्येक दिवसांत तशी कारवाई झालेली नाही. कुंभात स्वच्छता मोहिमेचा गवगवा करणाऱ्या महापालिकेपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस यंत्रणेपर्यंत सर्व काही शांत झाल्याचे दिसत आहे. या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ही बाब डेंग्यूसह आरोग्याचे वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्यास हातभार लावू शकतात. याचाही यंत्रणेला विसर पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा