जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील रविवारी होणाऱ्या दुसऱ्या शाही पर्वणीसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनाने फेरबदलानंतरची तयारी पूर्णत्वास नेली आहे. पहिल्या पर्वणीतील नियोजनावर आगपाखड झाल्यानंतर नाशिक व त्र्यंबक येथे होणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीत भाविक व शहरवासीयांना कमीत कमी त्रास होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सिंहस्थात श्रावण आमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे या महापर्वणीत मोठय़ा संख्येने भाविक स्नानासाठी दाखल होतील, असा अंदाज आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक येथे १५ हजार तर त्र्यंबक येथे सात हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
कुंभमेळा अंतर्गत १३ व १८ सप्टेंबर रोजीच्या उर्वरित दोन पर्वण्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने आधीचा बंदोबस्त व नियोजनात काही फेरबदल केले आहेत. वाहनतळ, बस स्थानक, घाटाकडे जाण्याचे व परतीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. स्नानासाठी भाविकांना पायी चालण्याचे अंतर कमी करण्यात आले.
शिवाय अंतर्गत काही मार्गावर बससेवा सुरू राहणार आहे. शहरवासीयांना दैनंदिन व्यवहार, दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे. त्र्यंबकेश्वर येथे रविवारी पहाटे चार तर नाशिक येथे सकाळी सहा वाजता शाही मिरवणुकीला सुरुवात होईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शेकडो सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. तसेच या माध्यमातून गर्दीचे नियोजन केले जाईल. नाशिक येथे साधुमहंतांचे शाही स्नान झाल्यानंतर रामकुंड व परिसरातील घाट भाविकांसाठी खुले करून दिले जाणार आहेत. देशभरातून येणारी खासगी वाहने शहराच्या हद्दीलगत रोखली जातील. तिथून भाविकांना बसने शहरात येण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने तीन हजार बसचा ताफा तैनात केला आहे.
त्र्यंबकेश्वरजवळील पहिणे येथे वाहने थांबविली जातील. नाशिकमध्ये विविध अंतर्गत वाहनतळांवर आलेल्या भाविकांना घाटावर स्नानासाठी पायी नेण्याचे नियोजन आहे.
पहिल्या पर्वणीत पुण्याकडून आलेल्या भाविकांना मोठी पायपीट करावी लागली होती. त्यामुळे या वेळी पुण्याकडून येणाऱ्या बसगाडय़ा थेट महामार्ग बसस्थानक व काठे गल्लीपर्यंत आणण्याचे नियोजन आहे. शहरवासीयांना काही विशिष्ट भागापर्यंत दुचाकी घेऊन भ्रमंती करता येणार आहे. वाहनांसाठी खास वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या पर्वणीला सर्वाधिक गर्दी होणार असल्याचे सांगितले जाते. नाशिक रोड रेल्वे स्थानक, गोदाकाठ सभोवतालचा परिसर, मिरवणूक मार्ग, बसस्थानक, यासह त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ, मिरवणूक मार्ग आदी ठिकाणी सुमारे ७०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. बॉम्बशोधकपथक, धडक कृती दल, लष्कर असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गरज भासल्यास लष्करी हेलिकॉप्टसची मदत घेतली जाईल.
भाविकांसाठी अंतर्गत बससेवा
शहरातील सातपूर, नवीन सिडको, त्र्यंबकरोड, श्रमिकनगर व पश्चिमेकडील परिसरातील भाविकांकरिता इदगाह मैदानापर्यंत बससेवा सुरू राहील. गिरणारे गाव, दुगाव, गंगापूर, सोमेश्वर, आनंदवल्ली परिसरातील भाविकांसाठी डोंगरे वसतीगृहापर्यंत बससेवा. अंबड, पाथर्डी फाटा, पांडवलेणी परिसरासाठी महामार्ग बस स्थानकापर्यंत. म्हसरुळ, मेरी परिसरासाठी डोंगरे वसतीगृहापर्यंत बससेवा. भगूर, देवळाली कॅम्प परिसरासाठी पाथर्डी फाटामार्गे महामार्ग बस स्थानकपर्यंत बससेवा उपलब्ध राहणार आहे.

या क्षेत्रात
वाहनांना प्रतिबंध
दिंडोरी नाका, मखमलाबाद नाका, अशोक स्तंभ, ज्योती बुक डेपो, टिळकवाडी सिग्नल, जलतरण सिग्नल, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, बागवानपुरा, ट्रॅक्टर हाऊस, संतोष टी पॉईंट, काटय़ा मारुती चौक येथून रामकुंड किंवा या क्षेत्राच्या आतील बाजूस असलेल्या सर्व रस्त्यांवर कोणतीही वाहने आणण्यास व उभी करण्यास प्रतिबंध
राहणार आहे.

धर्मशास्त्र अभ्यासकांचे आवाहन
कुंभमेळ्यात श्रावण अमावस्येला अनन्यसाधारण महत्व असते. सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मीळ योग १२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी आलेले भाविक आणि स्थानिकांनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४३ पासून महापर्व स्नानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यातील धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी केल्याचे पुरोहित संघाने म्हटले आहे. पहिल्या पर्वणीचा अनुभव संस्मरणीय नाही. त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली प्रशासनाने उपासना स्वातंत्र्यावर गदा आणली. शहरवासीयांना तर स्थानबध्द करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे वेगळी स्थिती नव्हती. तशी वेळ महापर्वाच्या दिवशी येऊ नये म्हणून संपूर्ण अमावस्येचा पर्वकाळ साधावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केले आहे.

Story img Loader