जळगाव: नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन तसेच एनबीए प्रक्रिया न केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न असलेल्या २४ महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाला प्रवेश निषिद्ध (नो अॅडमिशन) करण्याच्या निर्णयाला विद्यापरिषदेच्या बैठकीत सहमती देण्यात आली.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक झाली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. शासनाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालयांचे मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करावे, असे कळविले होते. नॅक वैधता संपुष्टात आलेल्या महाविद्यालयांनी प्रक्रिया तत्काळ सुरू करून ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रारंभीच्या टप्प्यातील संस्था नोंदणी करून आयआयक्यूए नॅक कार्यालयाला सादर करणे अनिवार्य असल्याचे शासनाच्या दोन मार्च २०२३ च्या पत्रात म्हटले होते.
हेही वाचा… भुसावळ: हतनूरच्या ४१ दरवाजांमधून विसर्ग
आयआयक्यूए सादर न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशास निर्बंध लागू करण्यात येतील, असे कळविले होते. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना याबाबत कळविले होते. २४ महाविद्यालयांनी प्रक्रिया केली नाही, तसेच आयआयक्यूएदेखील सादर केला नाही. त्यामुळे त्या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशाला बंदी घालण्यासंबंधीचा विषय २८ जूनला झालेल्या बैठकीत ठेवण्यात आला होता. या बैठकीत नॅकसाठी प्रक्रियेला सामोरे न गेलेल्या व आयआयक्यूए सादर न केलेल्या महाविद्यालयांना प्रवेश निषिद्ध (नो अॅडमिशन) समजण्यात यावे. नॅकसाठी पाच वर्षांआतील सुरू झालेल्या महाविद्यालयांना वगळावे, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला विद्यापरिषदेच्या झालेल्या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली.
प्रवेशासाठी निषिद्ध महाविद्यालयांमध्ये
सौ. प्रतिभाताई पवार महाविद्यालय (जळगाव), गोदावरी संगीत व फाइन आर्ट महाविद्यालय (जळगाव), आर. आर. वरिष्ठ महाविद्यालय (जळगाव), जे. डी. एम. व्ही. पी.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (वरणगाव), धनदाई माता एज्युकेशन संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय (अमळनेर), कमलआक्का पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय (अमळनेर), कला महाविद्यालय (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा), पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (देवपूर- वलवाडी- भोकर, धुळे), कै. बापूसाहेव शिवाजीराव देवरे कला व वाणिज्य महाविद्यालय (बोरीस, जि. धुळे), सरदार एज्युकेशन संस्थेचे हाजी सईद अहमद सरदार कला व विज्ञान महाविद्यालय (देवपूर, धुळे), विशाल शिक्षण प्रसारक मंडळाचे ए. बी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (महिंदळे, धुळे), एन. टी. व्ही. एस.चे कला, वाणिज्य महाविद्यालय (धानोरा, जि. नंदुरबार), ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. एम. डी. सिसोदे कला व वाणिज्य महाविद्यालय (नरडाणा, ता. शिंदखेडा), म. ज. पोहर्या वळवी कला व वाणिज्य, वि. कृ. कुलकर्णी महाविद्यालय (धडगाव, जि. नंदुरबार), एम. जी. तेले वाणिज्य, चिंधा व बारकू रामजी तेले विज्ञान आणि केशरबाई तेले व्यवस्थापन महाविद्यालय (थाळनेर, जि. धुळे), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (पाल, ता. रावेर, जि. जळगाव), आर. के. मिश्रा वरिष्ठ महाविद्यालय (बहादरपूर, जि. जळगाव), कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (बोराडी, धुळे), अमर संस्था संचलित कला महाविद्यालय (चोपडा, जि. जळगाव), विद्या विकास मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय (अक्कलकुवा, जि. नंदुरबार), आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे के. डी. गावित कला महाविद्यालय (धानोरा, जि. नंदुरबार), बळीराम पाटील कला व विज्ञान महाविद्यालय (बेहेड, जि. धुळे), ग्रामविकास शिक्षण मंडळाचे कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय (मारवड, जि. जळगाव), श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (चाळीसगाव, जि. जळगाव) यांचा समावेश आहे.