दत्तक नियमावलीत सुधारणा झाल्याने सध्या जिल्ह्यातील दत्तक विधान प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात येत आहे. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक आंतरराष्ट्रीय तर दोन बालकांचे देशातंर्गत दत्तक विधान असे एकूण तीन दत्तक विधानाचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संमत केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा >>>धुळे: मालमोटार चालकाला मारहाण करुन लूट
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धुळे जिल्ह्यातील तीन अनाथ बालकांना हक्काचे पालक व घर मिळाले आहे. धुळ्याच्या संस्थेतील एका अनाथ बालकाला विदेशातील हक्काचे आई-बाबा मिळाले असून हे बालक लवकरच नवीन आई-बाबांसह इटलीला रवाना होणार आहे. या बालकासोबतच इतर दोन बालकांचे अंतिम दत्तक विधान आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संमत केले आहेत. दत्तक नियमावलीनुसार न्यायालयासमोर होणारी दत्तक प्रकरणाशी संबंधित सर्व प्रक्रिया नवीन नियम लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त एक विशेष दत्तक संस्था कार्यरत असून या संस्थेने नवीन दत्तक नियमावलीनुसार या बालकांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर केले होते. त्याअनुषंगाने दत्तक ग्रहण समितीच्या निर्णयाच्या अधीन राहून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून बालकांच्या व पालकांच्या दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. हे प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम आदेशाकरिता सादर करण्यात आले होते.
हेही वाचा >>>नाशिक: ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाचे लक्ष, करारनाम्याच्या आधारे दावा सांगण्याचा मनसुबा
मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया
संभाव्य दत्तक इच्छुक पालकांनी सीएआरए डाॅट एनआयसी डाॅट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर ३० दिवसाच्या आत पालकांमार्फत आवश्यक दस्तऐवज पोर्टलवर टाकणे आवश्यक असते. पालकांनी गृह अभ्यास अहवालाकरिता जवळची विशेष दत्तक संस्था निवडणे आवश्यक असते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर दत्तक ग्रहणाचे अंतिम आदेश दिले जातात. यापूर्वी याबाबतचे आदेश न्यायालयामार्फत दिले जात होते. परंतु, आता हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संमत केले जातात. दत्तक विधान प्रक्रिया मध्यस्थांमार्फत होत नाही. जर कोणी मध्यस्थ गैरव्यवहार करत असेल तर त्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास कळवावी. तसेच याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यास तक्रार नोंदवावी. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी कळविले आहे.