नाशिक: अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे विशेष पथक आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या वतीने निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दुधाच्या साठ्यासह ४८,१६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोकडदरे शिवारातील कातकाडे मळा येथे अतुल कातकाडे यांच्या गोठ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. एक व्यक्ती दुधाच्या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले. पंचासमक्ष परिसराची झाडाझडती घेतली असता डेअरी परमीट पावडर १८ किलो, व्होल मिल्क पावडर ३४ किलो, तेलसदृश पदार्थ १७० लिटर आढळून आले. या सर्व पदार्थांची भेसळ करून ४२० लिटर गाईच्या दुधाचा साठा विक्रीसाठी तयार केल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन सर्व पदार्थांच्या उर्वरित साठ्यासह एकूण ४८१६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा… केळी पीक विम्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यात पिंडदान; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

भेसळयुक्त गाईचे दूध मानवी सेवनास येऊ नये या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले. भेसळयुक्त पदार्थांपैकी दूध पावडर हेमंत पवार यांनी तर तेलसदृश पदार्थाचा पुरवठा मोहन आरोटे यांनी केला. संबंधितांवर पुढील तपासणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, योगेश देशमुख यांनी विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे, सहायक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.