नाशिक – चैत्रोत्सवानिमित्त कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावर खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पेढा तसेच हलवा विक्रेत्यांकडून पाच लाख ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सप्तश्रृंग गडावर चैत्रोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा >>> भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

गडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करुन मावा पेढे, कंदी पेढे, मलाई पेढे, कलाकंद हे पदार्थ दुधापासून तयार केले असल्याचे भासवत पदार्थांमध्ये काही ठिकाणी भेसळ आढळली. मे. अभिजीत रमेश बोरे पेढा सेंटर या दुकानातून १२४ किलो, मयुरी प्रसाद पेढा सेंटरमधून ८९२ किलो, योगेश तिवारी यांच्या दुकानातून ५३ किलो, मे. श्री माँ भगवती पेढा सेंटर, अशाप्रकारे एकूण एक हजार ९४४ किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील खाद्य पदार्थाचे नमुने ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अन्य माल हा ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोत नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने केवळ यात्रोत्सवादरम्यान अशी कारवाई न करता कायम अशा प्रकारची तपासणी केली तरच, भेसळीला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

Story img Loader