लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : सेवेकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अण्णासाहेब मोरे हे हितगुज साधतात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे, अशी ग्वाही कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी दिली.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरीप्रणित शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यावतीने पंचवटीतील हनुमाननगरजवळील मैदानात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उदघाटन श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे आणि कृषिमंत्री कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. राज्यातील नऊ विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठका घेणार आहोत. शेतकऱ्यांना न्याय देणे, या उद्देशानेच शेतकऱ्यांशी हितगुज साधणार आहोत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे कठीण जाते. पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागते.
ग्राहकांना योग्य दराने माल मिळावा आणि शेतकऱ्यांनाही चार पैसे मिळावेत, याकरिता प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे कोकाटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी काही अडचणी असतील तर थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सर्वांना कळावे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सुटाव्यात, शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे विवाह व्हावेत, या उद्देशानेच कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले.
व्यासपीठावर आमदार दिलीप बनकर, चंद्रकांत मोरे, नितीन मोरे, आबासाहेब मोरे, कृषी संचालक सुभाष काटकर, आत्माचे संचालक अभिमन्यू काशीद, आत्माचे उपसंचालक विलास सोनवणे, जिल्हा कृषी अधीक्षक जगदीश पाटील आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर पाटील, गिरीश राणे, निखिल पेठे, गणेश तांबे या शेतकऱ्यांना कृषीमाऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्घाटनापूर्वी रामकुंड ते कार्यक्रम स्थळापर्यंत कृषी दिंडी काढण्यात आली.