जळगाव – शहरातील नीलेश भोईटे यांच्या घरावर डेक्कन पोलिसांनी अवैध छापा टाकल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अॅड. चव्हाण यांना रविवारी चाळीसगावातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा – नाशिक : विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू
जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ संस्थेतील वादाच्या प्रकरणात अॅड. विजय पाटील यांचे अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी पुणे येथील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात डेक्कन पोलिसांच्या पथकाने भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. भोईटे यांच्या घरातील रबरी शिके, बँकेचे पासबूक यासह इतर महत्त्वाचे दस्तऐवज संशयित बनावटीकरण करण्यासाठी घेऊन गेल्याप्रकरणी सात ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भोईटे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून अॅड. विजय पाटील आणि हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना संशयित तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, महेश पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, जयेश भोईटे आणि सुनील माळी या संशयितांची नावे वाढविण्यात आली. या प्रकरणात अॅड. चव्हाण यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी चाळीसगाव येथे अॅड. चव्हाण आले असता शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.