नाशिक – शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याचे केंद्र सरकारने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या २०२४-२५ वर्षाच्या प्राथमिक यादीत नामांकन केले आहे. युनेस्कोच्या समितीने मंगळवारी या किल्ल्याची हवाई पाहणी केली.

राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी भारतातील मराठा सैन्याच्या स्थापत्यकलेचा आविष्कार गटात राज्यातील ११ किल्ल्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील एकमेव साल्हेर किल्ल्याचा समावेश आहे. युनेस्कोच्या समितीचा हा पूर्वनियोजित दौरा होता. किल्ल्यावर पायी जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. पावसामुळे वाटा निसरड्या आहेत. या पार्श्वभूमीवर, समितीने हेलिकॉप्टरमधून साल्हेरची हवाई पाहणी केल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Dhule Vidhan Sabha Constituency : अल्पसंख्याकांची मते ठरू शकतात निर्णायक, शाह फारुक अनवर यांच्यासमोर ‘ही’ मोठी आव्हाने

डोलाबारी डोंगर रांगेवर समुद्रसपाटीपासून ५१४१ फूट उंचीवर साल्हेर किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. मराठा सैन्याने मोगलांविरुद्धची खुल्या मैदानातील जिंकलेली पहिली लढाई म्हणून इतिहासात साल्हेरची लढाई प्रसिद्ध आहे. युनेस्को समितीच्या दौऱ्याआधीच जिल्हा प्रशासन व पुरातत्व विभागाने स्थानिक पातळीवर जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले होते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्याचे महत्व, त्यामुळे येणारी जबाबदारी याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली गेली. या वारसास्थळात निवड होण्यासाठी स्वच्छता, किमान सोयी-सुविधा, स्थळांशी नागरिकांचे बंध, अशा अनेक निकषांवर मूल्यमापन केले जाते. त्या अनुषंगाने प्रशासनाने महावारसा समिती, स्मारक समितींची स्थापना केली आहे.