नंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावदप्रमाणेच नंदुरबार शहरातील मृत डुकरांच्या नमुन्यांचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून शहरातील डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाइन फिवरने झाल्याचा निष्कर्ष आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शहरात उपाययोजनांसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. संबंधित एक किलोमीटरचे क्षेत्र बाधित तर, १० किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरात काही दिवसांपासून डुकरांचे मृत्यूसत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपायुक्त डॉ. यु. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ फेब्रुवारी रोजी मृत डुकरांचे नमुने पुणे येथील विभागाीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून भोपाळ येथील ‘निशाद’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. भोपाळ प्रयोगशाळेकडून २१ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या अहवालानुसार शहादा तालुक्यातील म्हसावदप्रमाणेच नंदुरबार शहरातील डुकरांचाही आफ्रिकन स्वाइन फिवरने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष दिला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये प्राण्यांमधील संसर्ग व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमांन्वये शहरातील एक किलोमीटर परिघातील भागास बाधीत क्षेत्र तर, १० किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण म्हणून घोेषित करण्यात आले आहे. दरम्यान, २२ फेब्रुवारीपासून डुकरांचे कलिंग करण्यात येणार आहे. डुकर पालन करणाऱ्यांच्या भेटी घेऊन पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
हेही वाचा : गळतीमुळे शुक्रवारी नाशिकमधील पाच प्रभागात पाणी पुरवठा बंद
खबरदारीसाठी उपाययोजना
बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील डुकरांचे कलिंग करुन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. डुकरांच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी पूर्ण करुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोकाट पद्धतीने होणारे डुक्कर पालन टाळावे, डुक्कर पालन केंद्रातील तसेच मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये, सर्व कचरा नष्ट करावा, पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस व तपासणी नाके यांच्याशी समन्वय ठेवून शेजारील राज्यातील डुकरांचा अनाधिकृत प्रवेश होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.