नाशिक शहरात मोठ्या संख्येने मुक्त संचार करणारे भटके श्वान रस्ते अपघात, बालकांवरील हल्ल्याचे कारण ठरल्याचे दिसत असताना आता ते स्थानिकांमधील वादंगाचेही कारण ठरु लागले आहे. पंचवटीतील लाटेनगर भागात एका महिलेला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर संतप्त जमावाने श्वानांंची काळजी घेणाऱ्या माय-लेकींना मारहाण केल्याचा प्रकार घडला. यावेळी मायलेकीचा विनयभंग करीत जिवे मारण्याची धमकी दिली गेली. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या गुन्ह्यात संशयितांमध्ये माय-लेक तर दुसऱ्या गुन्ह्यात १२ महिला आणि पुरूषांचा समावेश आहे.
नाशिक शहरात ४५ हजारहून अधिक भटके श्वान असल्याचा महानगरपालिकेचा अंदाज आहे. गत आठवड्यात नांदुरनाका ते जत्रा हॉटेल मार्गावर मोकाट श्वान आडवा आल्याने दुचाकीवरून पडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. भटक्या श्वानांच्या हल्ल्यात बालके जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. काही भागात श्वानांची इतकी दहशत आहे की, जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. महानगरपालिका भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करते. परंतु, त्यांची संख्या नियंत्रित झाली का, याविषयी साशंकता व्यक्त होत असताना उपरोक्त घटना घडली. लाटेनगर भागात राहणाऱ्या एका महिलेवर भटक्या श्वानांनी हल्ला करीत चावा घेतला. यातून ही घटना घडली. मायलेक खाद्यपदार्थ देत असल्याने परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार करीत १० ते १२ महिला-पुरुषांच्या जमावाने त्यांना जाब विचारला. कुत्र्याच्या हल्ल्यास त्यांना जबाबदार धरले.
जमाव गोंधळ घालत असताना मुलीने भ्रमणध्वनीवर चित्रण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काहींनी मायलेकींना शिवीगाळ करीत मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला. यावेळी मायलेकींचे भ्रमणध्वनी फोडण्यात आले. जमावाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.