नाशिक : महावितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचा बनाव करून धुळे येथील एका व्यावसायिकाची १३ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या सुरत येथील तीन संशयितांना धुळे पोलिसांनी चार महिन्यांच्या तपासानंतर ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे येथील जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेसच्या नावाने इलेक्ट्रिकल दुकानाचे मालक जिजाबराव पाटील यांना वीज वितरण कंपनीच्या धुळे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भ्रमणध्वनी केला. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक लोकेश चंद्रा यांच्याशी महत्वाच्या कामानिमित्त संपर्क साधावा, असा निरोप दिला. चंद्रा हे आपल्याशी संपर्क साधतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण त्यांचा भ्रमणध्वनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. थोड्याच वेळात जिजाबराव यांच्या भ्रमणध्वनीवर व्हाटसअप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. लोकेश चंद्रा बोलत असल्याचे पलिकडून सांगण्यात आले. आपण आता वीज वितरण कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत व्यस्त असून आपले काका सुरत येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे आपण मला आठ लाख रुपये पाठवून द्या, मी आपले पैसे सायंकाळपर्यंत परत करणार, असे सांगण्यात आले. जिजाबराव यांनी या संभाषणावर विश्वास ठेवत तत्काळ संबंधित खातेधारकाच्या खात्यावर नेट बँकिंगद्वारे (आरटीजीएस) आठ लाख रुपये पाठवले. त्यानंतर पुन्हा दोन तासांनी भ्रमणध्वनी आला. काकांच्या उपचारासाठी आणखी पाच लाख रुपये पाठविण्याची विनंती चंद्रा नामक व्यक्तीने केली. यावेळी मात्र दहिसर (मुंबई) येथील खाते नंबर देण्यात आला. या नव्या खात्यावरही जिजाबराव यांनी पाच लाख रुपये पाठवले. नंतर जिजाबराव यांनी सायंकाळी पैसे मागणाऱ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. पुन्हा पुन्हा संपर्क केल्यावरही प्रतिसादच मिळत नसल्याने पाटील यांनी कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडून चंद्रा यांचा नंबर मिळवला. प्रत्यक्ष चंद्रा यांच्याशीच थेट संपर्क केला. आपण पैशांची मागणी केली नसल्याचे चंद्रा यांच्याकडून सांगण्यात आल्यावर जिजाबराव यांना धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. आपली १३ लाख रुपयांना फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा आज सादर; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक

सायबर पथकाने चार महिन्यांच्या प्रयत्नानंतर संशयितांचा शोध लावल. सुरत येथून यशवंत पाटील, जयशंकर गोसाई आणि विजय शिरसाठ यांना ताब्यात घेतले. तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, जगदीश खैरनार, खलाणेकर, राजु मोरे, मराठे, तुषार पोतदार यांच्या पथकाने केली.

हेही वाचा…पाणी नियोजन बैठकीत अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस

सायबर गुन्हेगारांपासून सावधान

सायबर गुन्हेगारांकडून आठ ते १० हजार रुपयांचे आमिष दाखवून बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाते. खाते उघडल्यानंतर याच खात्याचे एटीएम आणि खात्याला जोडलेले भ्रमणध्वनी सीमकार्ड घेतले जाते. त्या खात्यावर संशयितांकडून व्यवहार केला जातो. यामुळे संबंधित खातेदार मोठ्या प्रमाणात आरोपी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर कोणीही आपल्या स्वतःच्या नावाचे सीमकार्ड, स्वतःच्या बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देवू नये. श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक,धुळे)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After four months of investigation dhule police arrested three suspects from surat for cheating local businessman for 13 lakh sud 02