नाशिक : जिल्ह्यातील मुखेड येथील प्रतिक आहेर याच्या हत्येनंतर जिल्ह्यात ‘प्रेम व हिंसा’ या विषयावर प्रबोधन मोहीम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे. गावोगावी याबाबत प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील एका गावाने पालकांच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह केल्यास ग्रामपंचायत त्याची नोंद करणार नसल्याचा ठराव केला होता.
एकिकडे पालकांची परवानगी घ्या म्हणायचे आणि दुसरीकडे मुलीच्या पालकांनीच जीव घ्यायचा, हे निषेधार्ह आहे. पालक जर असा पवित्र घेणार असतील तर पालकांमध्येच जनजागृती होण्याची गरज असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले. प्रतिकच्या खुनाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी चांदगुडे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. गावोगावी असणाऱ्या अशा तथाकथित रखवालदारांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा : घरोघरी मतदार नोंदणीत संथपणा
हरियाणातील खापपंचायतीच्या वाढत्या अशा घटनांनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला होता. प्रेमाला विरोध करणाऱ्या अपप्रवृत्तींवर तिथे पोलिसांनी अंकुश लावला. पोलीस प्रशासनाच्या आवारात असणाऱ्या निवारा गृहात हिंसेचा विचार करणाऱ्या पालकांचे समुपदेशन केले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अशा अपप्रवृत्तींविरोधात शासनाने भूमिका घ्यावी, पुरोगामित्वाची परंपरा अधिक उज्वल करण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर डाॅ. टी. आर. गोराणे, प्रा. डाॅ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, ॲड. समीर शिंदे आदींची स्वाक्षरी आहे.