नंदुरबार – ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांमधील वादाचे प्रकरण गाजत असतानाच नंदुरबारमध्येही सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष उघडकीस आला आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या हमाली ठेक्यावरुन हाणामारीसह हमाल अपहरणाचा प्रकार घडला. या प्रकरणात दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून एका गुन्ह्यात सत्ताधारी भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह इतर बड्या नेत्यांची नावे असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील अन्न महामंडळाच्या गोदामातील अन्नधान्याच्या गोण्या चढवणे आणि उतरवणाऱ्या मजुरांच्या हमाली ठेक्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री धुळे येथील दिनेश चौधरी यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपचे नेते विक्रांत चौधरी, शिंदे गटाचे माजी नगरसेवक किरण रघुवंशी, राष्ट्रवादीचे विशाल नवले, भाजपचे माजी नगरसेवक गौरव चौधरी, प्रशांत चौधरी आणि जनक जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ठेका बंद करण्याच्या हेतूने ठेक्याच्या ठिकाणी जाण्यास रोखले. शिरीष चौधरी यांनी तक्रारदार आणि साक्षीदार यांना मारहाण केली. साक्षीदाराने ज्या मोबाईलमध्ये या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले होते, तो नष्ट करण्यासाठी गाडीच्या चाकाखाली मोबाईल फेकून त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा – लोकसभेवेळी विधानसभेचे जागा वाटप झाले तरच भाजपला मदत – बच्चू कडू यांचा इशारा

हा गुन्हा दाखल होत नाही तोच या ठेक्यावरील तब्बल ३५ हमालांचे अपहरण झाले. रात्री या सर्व मजुरांना एका वाहनात बसवून नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली. जागोजागी नाकाबंदी करुन संबंधित वाहनाचा पाठलाग करुन शिंदखेडा तालुक्यातून संबंधित वाहन अडविण्यात आले. वाहनातून ३५ हमालांची सुटका केली. या अपहरण प्रकरणात रुपेश यादव (रा. भरतचंद्र, बिहार) यांच्या तक्रारीवरुन गाडी चालक राहुल गोपाल बाविस्कर, भाजपचे माजी नगरसेवक गौरव चौधरी, जनक जैन यांच्यासह सात ते आठ संशयितांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – धार्मिक पर्यटन, उद्योग, व्यवसायांवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून; नाशिक जिल्ह्यचा विकास दर १३.१ टक्के

हमालीचा मिळालेला ठेका चालू न देण्याच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असताना एका गटाकडून दुसऱ्या गटावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या गटाकडूनदेखील या प्रकरणी ॲट्राॅसिटी विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रार अर्ज दिल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After thane there is also a clash between the rulers in nandurbar a case has been filed against the former bjp mla in the case of abduction and a scuffle over the hamali contract ssb
Show comments