नाशिक – पुरातत्व विभागाच्या नाशिक विभाग सहायक संचालक आरती आळे आणि पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्याविरोधात दीड लाख रुपयांच्या लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर पुरातत्व विभागाचा वादग्रस्त कारभारही चर्चेत आला आहे. शहरातील कित्येक वर्षांपासून सुरु असलेले सुंदर नारायण मंदिर दुरुस्तीचे काम, जिल्ह्यातील हेमाडपंथी मंदिर, देवस्थान आदींविषयी पुरातत्व विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुरातत्व विभागाच्या वतीने सहा वर्षांहून अधिक काळापासून रविवार कारंजाजवळील सुंदर नारायण मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. करोनामुळे दोन वर्ष कामाला स्थगिती देण्यात आली होती. हे काम संशयास्पद राहिले आहे. स्थानिकांनी याविषयी तक्रारी केल्या आहेत. मंदिराचा कळस उतरवित असतांना मंदिरावरील सुंदर नक्षीकाम असलेले दगड, दिशादर्शक दगड गायब आहेत. त्या सुंदर दगड, मूर्तीची विक्री झाल्याची चर्चा आहे. याबाबत स्थानिक संबधित विभागाशी संपर्क केला असता यातील काही दगड पांडवलेणीमध्ये असल्याचे सांगितले. परंतु, त्या ठिकाणी नक्षीकाम असलेले दगड गायब आहेत.
हेही वाचा >>>राजकीय आकसामुळेच बडगुजर यांना नोटीस – मविआचा आरोप
जिल्ह्यातील जुन्या हेमाडपंथी मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहेत. त्यातील सागवान लाकूड, दगड गायब आहेत. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या बांधकामासंदर्भात ३२ कामांची यादी देण्यात आली. यामध्ये पायरी तुटली, कळस यासह अन्य कामांविषयी सांगण्यात आले. या साठी निधी कमी पडत असेल तर देवस्थानच्या वतीनेही मदत करण्याची तयारी दर्शविली. मात्र सहा वर्षांपासून ही कामे प्रलंबित आहेत.