नाशिक : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये नाशिकमधील ७७ प्रवासी थांबले होते. त्यांना लवकर परतण्याची इच्छा होती. परंतु, विमान तिकीट मिळत नव्हते, त्यांची नावे प्रशासनाने शासनाकडे पाठविली. अडकलेल्या बहुतेकांची पुढील एक ते तीन दिवसांत परतीची विमान तिकीटे आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील पर्यटक लवकरच नाशिकला परतू लागतील, असा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.
उन्हाळी सुट्टीत प्रवासी कंपन्या वा वैयक्तिक नियोजन करून अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये गेले होेते.

मंगळवारी पहलगावमधील दहशतवादी हल्यामुळे सर्वांना आपली सहल थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. प्रशासनाच्या माहितीनुसार विविध प्रवासी कंपन्यामार्फत गेलेले ५० आणि वैयक्तिक नियोजन करून जाणारे २६ असे एकूण ७६ पर्यटक सुरक्षितस्थळी थांबले आहेत. काहींची विमानांची तिकीटे नंतरची आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी संबंधितांना लवकर आणण्याची मागणी केली होती. अशा पर्यटकांची यादी प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी दिली.नाशिकमधील सर्व ७६ पर्यटक तिथे सुरक्षित आहेत. संबंधितांनी विमानांची केलेली पूर्वनोंदणी शुक्रवार ते रविवार दरम्यानची आहे. त्यामुळे हे पर्यटक परतण्यास सुरुवात होईल. प्रवासी कंपन्यामार्फत गेलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन संबंधित कंपनीकडून केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.