अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कारखान्यात शुक्रवारी सकाळी अवतीर्ण झालेल्या बिबटय़ाला पाहून कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली. याची माहिती कर्णोपकर्णी पसरल्यानंतर गर्दी जमा झाली आणि तो कारखान्यातील एका कक्षात दडून बसला. एरवी गर्दी पाहिल्यावर बिबटय़ा सैरभैर होऊन हल्ला चढविण्यासही मागे पाहात नाही, परंतु या बिबटय़ाच्या उपरोक्त हालचालींनी तो बछडा असल्याचे अधोरेखित झाले. त्याचे वय आणि वजन किती असू शकेल याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी बांधला. कारण, पूर्ण वाढ झालेल्या बिबटय़ाला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस देणे वेगळे आणि सात ते आठ महिन्यांच्या बछडय़ाला डोस देणे वेगळे. औषधाची मात्रा जादा झाल्यास बछडय़ाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे लक्षात घेत वन अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्वक स्थिती हाताळत ‘ब्लो पाइप’च्या साहाय्याने औषधांचा मारा करत बछडय़ाला बेशुद्ध करत पिंजऱ्यात बंद केले. हा नर बछडा केवळ सात ते आठ महिन्यांचा आहे.
नाशिक शहरात बिबटय़ाने शिरकाव करण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी वाट चुकलेल्या बिबटय़ांनी शिरकाव नव्हे तर, नागरी भागात जेरबंद करताना हल्ले चढविल्याची काही उदाहरणे आहेत. अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर बिबटय़ाचे शुक्रवारी आगमन झाले.
पांडवलेणीच्या समोर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत अंबड औद्योगिक वसाहत आहे. याच परिसरातील क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कारखान्यातील एका विभागात सकाळी साडेआठच्या सुमारास बिबटय़ाचे दर्शन झाले. कारखान्यातील हा विभाग रात्रीच्या वेळी बंद असतो. सकाळी कर्मचारी आतमध्ये आल्यावर त्यांना बिबटय़ा दृष्टिपथास पडला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाहेर धूम ठोकली. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी, वन विभाग व पोलिसांना कळविण्यात आली. बिबटय़ाची माहिती समजल्यावर कारखान्यातील कामगारांची उपरोक्त विभागाबाहेर गर्दी जमली. पोलीस, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी दरम्यानच्या काळात दाखल झाले. बाहेरील गर्दी पाहून बिबटय़ा एका कपाटामागे लपून बसला. त्याच्या हालचालींचा कानोसा वन अधिकारी घेत होते.
सर्वसाधारणपणे बिबटय़ा एखाद्या भागात अडकल्यावर बचावात्मक पवित्रा घेत नाही. त्याच्या हालचालींवरून तो बछडा असल्याचे स्पष्ट झाले. पण ही बाब त्याला जेरबंद करताना आव्हान ठरली.बिबटय़ाला पकडण्यासाठी गुंगीच्या औषधांचा मारा करून बेशुद्ध केले जाते.
हा बछडा असल्याने औषधांची मात्रा किती द्यायची, याचा गांभीर्याने विचार करावा लागल्याचे उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी सांगितले. सकाळी अकराच्या सुमारास ब्लो पाइपच्या साहाय्याने औषधाचा मारा करत त्याला बेशुद्ध करण्यात आले. नंतर कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात टाकून त्यास आपल्या रोपवाटिकेकडे नेले. जवळपास दीड ते दोन तासांनंतर जेरबंद करण्याची मोहीम यशस्वी झाली.
औद्योगिक वसाहतीच्या या परिसरासमोर विस्तीर्ण लष्करी परिसर आहे. त्या भागात मुक्त संचार करणारे बिबटे कधीकधी नागरी भागात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तसाच काहीसा हा प्रकार असल्याची शक्यता कामगारांनी व्यक्त केली. बछडय़ाला जेरबंद करण्याच्या मोहिमेचा कारखान्यातील दैनंदिन कामावर काही काळ परिणाम झाला. पकडलेला बिबटय़ा नर असून तो सात ते आठ महिन्यांचा आहे. त्याचे वजन ३५ किलो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा