नाशिक : अयोध्येतील राम मंदिरातील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब काळाराम मंदिरात महाआरती व रामकुंडावर गोदा पूजन केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर व जाहीर सभेतून लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग श्रीरामाच्या भूमीतून फुंकले होते. तेव्हापासून राजकीय पदाधिकाऱ्यांचा काळाराम मंदिरात दर्शनासाठी ओघ सुरू झाला.
दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे राज ठाकरे आदी प्रमुख नेत्यांचा त्यात समावेश आहे.
हेही वाचा >>> नाशिक जिल्ह्यातील अपघातात चार जणांचा मृत्यू, तीन जखमी
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आले होते. शहरात रोड शो झाल्यानंतर त्यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात महाआरती केली. काळाराम मंदिरात भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले. तेव्हापासून या मंदिराकडे राजकीय नेत्यांचा ओघ सुरू झाल्याचे मंदिर संस्थानाकडून सांगितले जाते. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांआधी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या मंदिरास भेट दिली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी शहरात दाखल होत आहे. या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करणार आहेत. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरास त्यांना भेट देण्याची इच्छा असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले. नाशिक शहरात गांधी यांचा खुल्या वाहनातून रोड शो होणार आहे.