अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन पातळीवर उदासिनता दिसून येत आहे. संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच बैठक दिल्याने काही काळ येथील कॅम्प रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा- जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; रुग्णवाहिकेच्या थकीत रकमेसाठी टोकाचे पाऊल
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
यावर्षी सुरुवातीपासून सतत व मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे कांदा, मका, बाजरी, भुईमूग, डाळिंब, कडधान्य अशा सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई देणे अभिप्रेत असताना तालुक्यातील केवळ २२ गावांमधील नुकसानीचेच पंचनामे महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणांनी केले आहेत. त्यामुळे पिके हातची गेली असताना बहुसंख्य शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याबद्दल आंदोलकांनी आक्षेप घेतला आहे.
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
अतिवृष्टी, पुरांमुळे नदी आणि नाल्यांच्या काठावरील अनेक ठिकाणी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. नाळे येथे पाझर तलाव फुटल्याने शंभर एकरावरील शेतीचे पिकांसह नुकसान झाले. तलावाखालील भागातील विहिरी गाळाने भरुन गेल्या. अशा प्रकारे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई द्यावी, तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा कंपन्यांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा घडवून आणावी, बँक कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हेही वाचा- नाशिक : मातोश्री वारीत दोन नगरसेवकांच्या अनुपस्थितीने संभ्रम ; भाजपच्या पूनम धनगर शिवसेनेत
राज्य सरकारवर जोरदार टीका
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जयंत पवार, तालुकाध्यक्ष संदिप पवार, विजय दशपुते, काँग्रेसचे प्रसाद हिरे, शिवसेनेचे रामा मिस्तरी, राजाराम जाधव, प्रमोद शुक्ला आदी सहभागी झाले होते. यावेळी विविध वक्त्यांनी राज्यातील भाजप-शिंदे गटाच्या सरकारवर सडकून टीका केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी घायकुतीला आला असला तरी या सरकारला शेतकऱ्यांच्या दु:खाशी काहीच देणे,घेणे नाही, सत्ता टिकविणे हेच या मंडळीचे एकमेव ध्येय आहे,असा आरोप यावेळी करण्यात आला.