विनाअट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी बुधवारी वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्री शक्ति सामाजिक संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात आदिवासी कोळीढोर, टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हार कोळी आदींचा समावेश होता.
हेही वाचा >>> बक्षी समितीच्या शिफारसींमध्ये अन्याय ; महाराष्ट्र पोलीस परिवाराची तक्रार
आदिवासी कोळी, ढोर, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांच्यावर आदिवासी विभागाच्या निष्काळजीपणाने वर्षानुवर्ष अन्याय होत आहे. १९५० पूर्वीच्या कोळी नोंदींवर खान्देशातील मूळ आदिवासी असा उल्लेख असूनही संबंधित विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचेचे प्रमाणपत्र प्रांताधिकारी देत नाहीत. जात वैधता प्रमाणपत्रही देण्यात येत नाही. कोणत्याही आदिवासीं योजनांचा आदिवासी कोळी यांना लाभ किंवा सवलतही मिळत नाही. यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. न्याय मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो वंचित आदिवासी कोळी समाजातील नागरिकांनी महाआक्रोश मोर्चा काढला.