कृषी पिकांना भाव मिळेलच याची हमी नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकीकडे कृषिपूरक व्यवसायांकडे वळण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. परंतु, जिल्हा बँकेकडून त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. ‘फार्म हाऊस’साठी अर्थसाह्य देणारी जिल्हा बँक कृषी पर्यटन केंद्रासाठी मात्र कोणत्याही प्रकारच्या कर्जाची व्यवस्था करीत नाही, अशी खंत कोकण कृषी पर्यटन विकास संस्था व ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम एजंटस ऑर्गनायझेशन ऑफ नाशिक (तान) या संस्थेचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी व्यक्त केली.
हिवाळा हा पर्यटनासाठी पोषक हंगाम असल्याने या हंगामात पर्यटक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडत असताना जिल्ह्य़ात शेतीच्या सान्निध्यात राहून निवांतपणा धुंडाळणाऱ्यांना तसे फारसे काही हाती लागत नाही. या पाश्र्वभूमीवर भालेराव यांनी आपली भूमिका मांडली.
जिल्हा बँकेच्या भूमिकेमुळे कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेक शेतकऱ्यांना निराश व्हावे लागत आहे. जिल्हा बँकेने आपल्या धोरणात बदल करून युवा शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पुढे केल्यास जिल्ह्य़ातील कृषी पर्यटनात वाढ होऊन शेतीला जोडधंदा मिळू शकेल. त्यामुळे एखाद्या हंगामात कृषी पिकांना आसमानी तसेच सुलतानी संकटास सामोरे जाण्याची वेळ आली तरीही शेतकऱ्यांना फारसा आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शांत, निवांत आणि ग्रामीण जीवन जवळून न्याहाळण्याची आवड असलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार आता चांगलाच रूजला आहे. शेतकरी घाम गाळतो. रात्रंदिवस काम करून जेव्हा हाती येणाऱ्या पिकाला योग्य भाव मिळत नाही तेव्हा त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. कधी लहरी निसर्गाचा फटका बसून येणाऱ्या पिकावर बघता बघता त्याला पाणी सोडावे लागते. त्यामुळेच शेतकऱ्यांना आता कृषिपूरक व्यवसाय गरजेचा झाला आहे. अशा शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व्यवसायाची महत्त्वपूर्ण साथ मिळू लागली आहे. कृषिवर देशातील सुमारे ८० टक्के लोक अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळून शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडू शकते.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) यांसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात स्थापन झालेल्या संस्थांकडून कृषी पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास यानुसार कृषी पर्यटनाचा विचार करणे गरजेचे झाले आहे. शहरी जीवनातील दैनंदिन ताणतणाव काही दिवस का असेना विसरण्यासाठी शहरांतील नागरिक कृषी पर्यटनाला प्राधान्य देऊ लागले आहेत. शहरी भागातील व्यस्त जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस कृषी पर्यटनास अधिक महत्त्व येणार असून ज्या गावांमध्ये कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत, त्या परिसरातील अनेक स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यासह काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांच्या हातात पैसा येऊ लागला आहे. राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांची संख्या ३२८ पर्यंत गेली असून ही संख्या पाहता नाशिक जिल्ह्य़ात मात्र त्यामानाने ही संख्या कमी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ‘महाभ्रमण’ योजनेतच या केंद्रांची नोंद होत असून त्यानुसार जिल्ह्य़ात अशा केंद्रांची संख्या १३ आहे. ही संख्या जिल्हा बँकेने आर्थिक सहकार्य केल्यास अधिक वाढू शकते.
कृषी पर्यटनाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलेले नाही. कृषी पर्यटन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करू शकते. या पर्यटनामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारणही बदलण्यास मदत होऊ शकते, असे भालेराव यांनी नमूद केले.
अलीकडेच नाशिक येथे आयोजित एका कृषी पर्यटनविषयक कार्यक्रमाव्दारे जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची तयारी आठ जणांनी दर्शविली असून त्यांना आमच्या संघटनेमार्फत सहकार्य करण्यात येणार असल्याची माहितीही भालेराव यांनी दिली.
एखाद्या शेतकऱ्याने कोणतीही विशेष माहिती न घेता कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यास त्यात फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. काही केंद्रचालक आपल्याकडे येणाऱ्या शहरी पर्यटकांच्या मानसिकतेचा कोणताही विचार न करता त्यांना जे कायम शहरात मिळत असते, ते देण्याचा प्रयत्न करतात. लॉन, स्विमिंग टँक, पिझ्झा, वडापाव, बर्गर असे सर्वकाही देतात. त्याऐवजी चुलीवर केलेला स्वयंपाक द्यावा, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थाऐवजी भाजी, भाकर, ठेचा, मांडे, दूध, दही आदींचा समावेश जेवणात करण्याची गरज आहे. अशी सर्व प्रकारची शास्त्रोक्त माहिती आमच्या संस्थेकडून देण्यात येत असल्याचे भालेराव यांनी नमूद केले.
माहितीसह ओळख करुन दिल्यास व्यवसायात निश्चित यश
सहा लाखापासून तर १० लाखापर्यंतच्या खर्चात आपआपल्या कुवतीनुसार शेतात निवासासाठी किमान सहा खोल्या, एखादी सभामंडपासारखी मोठी खोली याच्यासाठीच प्रामुख्याने खर्च येतो. शेतात बैलगाडीतून फेरफटका, गुरांना जवळून न्याहाळणे, म्हैस किंवा गाईचे दूध पारंपरिक पद्धतीने कसे काढले जाते, खापरावर मांडे कसे केले जाते या अशा लहान-सहान गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने नेहमीच्या असल्या तरी शहरी वातावरणात रूळलेल्यांसाठी ते मोठे अप्रूप असते. त्यांना असेच काही देण्याचा प्रयत्न कृषी पर्यटनातून होणे आवश्यक आहे. कृषी पर्यटन केंद्रात येणारे पर्यटक हे आपले पाहुणे आहेत असे समजून शेतकऱ्यांनी त्यांच्याशी व्यवहार करणे गरजेचे आहे. पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीसह शेतीची माहिती, कोणते पीक कसे येते, कोणत्या फळापासून शरीराला कोणता फायदा होतो याची माहिती देण्यासह परिसरातील डोंगर-दऱ्या, मंदिरांची ओळख करून देणे असे प्रयत्न झाल्यास हा व्यवसाय निश्चितच यशस्वी होऊ शकतो, अशी माहिती दत्ता भालेराव यांनी दिली