मोठ्या कुटुंबात चार भावांमध्ये थोड्याफार कुरबुरी होत असतात. शिवसेना (शिंदे गट) हा मोठा परिवार असून कुणातही विसंवाद नाही. मतभेद नाहीत. मुख्यमंत्री प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करतात. त्यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी काहींना मंत्रिपदाची शपथ देण्याची तयारी केलेली आहे. एकंदर परिस्थिती बघून योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे संकेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषीथॉन प्रदर्शनास भेट देण्यासाठी शनिवारी आलेल्या सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सावधपणे उत्तरे दिली.
हेही वाचा- जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांची शरद पवारांवर स्तुतिसुमने
शिंदे गटात कुठलीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दौऱ्याची तारीख बदलल्याने गुवाहाटीला आपण जाऊ शकलो नाही, नाशिक आणि सिल्लोड येथील कार्यक्रमांसाठी आधीच वेळ दिलेली होती, असे कारण सत्तार यांनी पुढे केले. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेला, असा दाखला त्यांनी दिला. या दौऱ्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या टिकेचा सत्तार यांनी समाचार घेतला. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. ती धार्मिक भावना आहे. अजितदादांनी बारामतीचा चांगला रेडा शोधून गुवाहाटीला जावे, असा सल्ला त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या कथित भविष्य पाहणीवरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांची गाडी स्थानिक आहे. हात दाखवा गाडी थांबवा. शिंदे यांनी कोणाकोणाला हात दाखविला, हे तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कळेल. मुख्यमंत्र्यांचा हात कसा आहे, हे विरोधकांनाही कळेल, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा- नाशिकमध्येच ५० हजार मेट्रिक टन कांद्याची विक्री; दर पाडण्यास नाफेड जबाबदार असल्याचा आरोप
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील विश्वास कमी झालेला नाही. उलट संपूर्ण राज्यातून माजी आमदार-खासदार, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्यात दौरे सुरु केल्यावरुनही सत्तार यांनी टीका केली. त्यांनी आधीच दौरे केले असते तर आज इतकी वाईट स्थिती झाली नसती. पश्चाताप करावा लागला नसता. इतके खासदार, आमदार कसे फुटले, याचे मूल्यमापन त्यांना करावे लागेल. अडीच वर्षात ते केवळ चार वेळा मंत्रालयात गेले. मंत्र्यांनाही त्यांची भेट मिळत नव्हती. उद्धव ठाकरे यांना जमत नसल्यास रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे, अशी मागणी आपण तेव्हा केली होती. परंतु, त्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची संमती आवश्यक होती, याकडे सत्तार यांनी लक्ष वेधले.