नाशिक : बनावट दस्तावेज सादर करून अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे हे सोमवारी येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत. न्यायालयाने कोकाटे यांच्या चारही सदनिका ताब्यात घेण्याच्या दिलेल्या आदेशावर न्यायालयीन निकालाची प्रत मिळाल्यावर आणि अपील कालावधी संपल्यानंतर कार्यवाही करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

सधन कुटुंबातील मंत्री कोकाटे यांनी शहरातील उच्चभ्रू वसाहतीत सदनिका मिळविण्यासाठी स्वत:सह भावाचे उत्पन्न ३० हजारांपेक्षा कमी दाखवत शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी येथील न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला. आमदारकी धोक्यात आल्याने जामिनावर मुक्तता झालेल्या ॲड. कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आम्ही प्रमाणित प्रतींसाठी अर्ज करून उर्वरित तयारी पूर्णत्वास नेली आहे. सोमवारपर्यंत शिक्षेच्या निकालास सत्र न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी माहिती कृषिमंत्री कोकाटे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या प्रकरणात दिवाणी व फौजदारी असे दोन दावे दाखल होते. दिवाणी न्यायालयात कृषिमंत्री कोकाटे यांच्यासह सर्व चारही जणांची मुक्तता झाली होती. अपिलात या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडल्या जातील, असे कोकाटे यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश

कृषिमंत्री कोकाटे यांनी लाटलेल्या चारही सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर आणि अपील कालावधी संपल्यानंतर जप्तीची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अल्प उत्पन्न गटातील सदनिका घेणाऱ्या ॲड. कोकाटे यांनी ३१ वर्षांपूर्वी रोकड हाताळणीत सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. याचीही पडताळणी करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले.

Story img Loader