नाशिक : राज्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असून काही माल खरेदी करणे बाकी आहे. सोयाबीनच्या दराविषयी कुठल्याही तक्रारी नसल्याचा दावा कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी केला आहे. सोयाबीनसाठी नवीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री कोकाटे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय आपल्या स्तरावरील नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवरील हा विषय आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात तसे आश्वासन दिल्याचे ऐकण्यात नसल्याचे कोकाटे यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नसल्याचे प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाले होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अडीच हजार कोटीहून अधिकची रक्कम राज्य हिस्सा अनुदान म्हणून विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

पुढील चार-पाच दिवसात विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातील. महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईसाठी कायद्याची गरजही ॲड. कोकाटे यांनी मांडली. महापुरूषांविषयी बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. नाहक कुणी अकलेचे तारे तोडू नयेत. वेडीवाकडी चर्चा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी हॅकेथॉन स्पर्धा

उत्पादन वाढीसाठी शेतीत प्रयोग करून नवीन वाण निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी हॅकेथॉन स्पर्धा घेण्याचे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी केंद्रांची स्पर्धेतून निवड केली जाईल. त्यांचाही शासनस्तरावर सन्मान केला जाणार असल्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत आयोजित कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन प्रयोग, योजना कार्यान्वित करण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे.

प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषीविषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्राचार्य शिवाजीराव आमले आदी उपस्थित होते.