नाशिक – बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी वकिलामार्फत जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.
सुनावणीवेळी कृषिमंत्री कोकाटे हे न्यायालयात उपस्थित होते. शिक्षा सुनावल्यानंतर वकिलामार्फत त्यांनी जामिनाची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यानंतर ॲड. कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सर्वच कृषिमंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे प्रकरण आपण कृषिमंत्री झाल्यानंतरचे नसल्याकडे लक्ष वेधले. साधारणत: ३० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणास राजकीय किनार आहे.
दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्याकडून या संदर्भात तक्रार केली गेली होती. नंतर मात्र आपली त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. तेव्हा आपण राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. आमदार होतो की नव्हतो तेही स्मरणात नाही. तो काळ आणि आजचा काळ यात फरक आहे. पुढील काळात माजीमंत्री तुकाराम दिघोळे व आपल्यास सलोख्याचे, मैत्रीचे संबंध निर्माण झाले. परंतु, एखादे कायदेशीर प्रकरण दाखल झाल्यानंतर कायदेशीररित्या नियमानुसार प्रक्रिया पार पडते. उशिराने ही प्रक्रिया झाली आणि न्यायालयाने आज निकाल दिला, असे कोकाटे यांनी सांगितले.
कमी उत्पन्न दाखवून चार सदनिका लाटल्याच्या प्रश्नावर कृषिमंत्री कोकाटे यांनी अद्याप आपण निकालपत्र वाचलेले नसल्याचे नमूद केले. सरकारी वकिलांचे म्हणणे माहिती नाही. निकालपत्र वाचल्यानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपलाही दाद मागण्याचा अधिकार
न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते. परंतु, अपिलात जाण्याची तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत. आपण अपिलात जाणार आहोत. न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे, तसाच आपणास वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले आहे.