येथील ह्य़ुमन सव्‍‌र्हिस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झिबीटर्स यांच्यातर्फे आयोजित कृषिथॉन महोत्सवास गुरुवारपासून सुरुवात होत आहे. त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात कृषी क्षेत्राशी संबंधित व्याख्याने, परिसंवाद तसेच अन्य भरगच्च उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून १२ डोममध्ये २५० स्टॉलधारक, चर्चासत्रासाठी दोन व्यासपीठ, शेती अवजारासाठी विशेष कक्ष, शेतीसंबंधी उपकरणे, तंत्रज्ञान यांचे विभाग तसेच कृषी संलग्न व्यवसायाचे स्टॉल राहणार आहेत. प्रदर्शनातून माहितीसोबत ‘बीटूबी’ या विभागात कृषीसंबंधी उद्योजक, इतर उद्योजक यांना एकत्र आणून त्यांच्यात व्यवसायपूरक संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तसेच कृषी अ‍ॅग्रो करिअर व जॉब फेअर अंतर्गत कृषी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील उत्पादन कंपन्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.
या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास हातभार लागेल. देशातील नामवंत कृषी कंपन्या व संस्थांसह सिंगापूर, इस्त्राइल आदी देशांतील कृषी कंपन्याही महोत्सवात सहभागी झाल्या आहेत.
राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती, शासकीय विभागांचे स्टॉल, बचत गटांचे स्टॉल, केंद्र सरकारच्या कृषी विभागासह निमशासकीय संस्थांची मांदियाळी कृषीथॉन मध्ये राहणार आहे. डेअरी एक्सपो विभागात सेंद्रिय दूध उत्पादन, पशुपालकांना व्यवसाय वृद्धी, ग्राहक व बाजारपेठेतील कल, दुग्ध व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप देणारे तंत्र आदींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
३० नोव्हेंबपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात कृषीशी संबंधित विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रानंतर गुरुवारी दुपारी तीन वाजता ज्येष्ठ सेंद्रिय शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांचे ‘झिरो बजेट-नैसर्गिक शेती व महाराष्ट्रातील शेती समस्या’, शुक्रवारी सकाळी सदाशिव शेळके यांचे ‘किफायतशीर द्राक्षोत्पादनाचे यशस्वी तंत्रज्ञान’, दुपारी ज्येष्ठ जलतज्ञ सुरेश खानापूरकर ‘जलसंधारणाचा यशस्वी प्रयोग- शिरपूर पॅटर्न’, शनिवारी सकाळी डॉ. बाबासाहेब गोरे यांचे ‘डाळिंब उत्पादनाचे यशस्वी तंत्रज्ञान’, दुपारी एस. बी. माने यांचे ‘ऊस उत्पादनाचे यशस्वी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होईल.
रविवारी सकाळच्या सत्रात अभिनव फार्मस क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांचे ‘शेड नेट पॉली हाऊसमधील यशस्वी भाजीपाला उत्पादन व विक्री’, दुपारी डॉ. सतीश भोंडे यांचे ‘कांदा उत्पादनाचे यशस्वी तंत्रज्ञान’ व्याख्यान होईल. या उपक्रमाचा समारोप सकाळी डॉ. चंद्रकिरण संत यांचे ‘आदर्श दूध उत्पादनाचे तंत्र व मंत्र’ आणि दुपारी गुड्डु पवार यांचे ‘शेळीपालन -कृषी जोडधंदा’ व्याख्यान होईल. नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Story img Loader