नाशिक : शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निर्धार शिबिराच्या माध्यमातून तयारीला सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी येथे होणाऱ्या पहिल्याच शिबिरात विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे सकाळी साडेनऊ वाजता शिबिरास सुरुवात होईल. शिबिरात वेगवेगळ्या विषयांवरील सत्रात खा. अरविंद सावंत, राजन विचारे आणि चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. आदित्य ठाकरे आदी नेते सहभागी होतील.

विधानसभेच्या निकालानंतर यानिमित्ताने ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. निकालाच्या धक्क्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. तत्पूर्वी संघटनात्मक बांधणीसह मतदार यादीनिहाय काम करण्याकडे पक्षाने लक्ष केंद्रीत केले. त्याचाच एक भाग म्हणून गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुखांना केंद्रनिहाय मतदार यादीवर काम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन होईल. संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी यावर मंथन होईल.

एआयआधारे बाळासाहेबांचे भाषण दाखविण्याचे नियोजन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे याआधी कधीही न ऐकलेले भाषण एआय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दाखविण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून बाळासाहेब स्वत: या शिबिराला उपस्थित आहेत की काय, अशी अनुभूती येईल, तांत्रिक बाबींमुळे शिबिरात हा प्रयोग होतो की नाही, याबाबत साशंकता आहे.

सिंधुदुर्गमध्ये हत्या होत असताना गृहमंत्री गप्प का ? संजय राऊत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा राजकीय हत्यांचे सत्र सुरू झाले आहे. रस्त्यावर खुलेआम हत्या होत असताना गृहमंत्री काय करताहेत, या प्रकरणातील आका मंत्रिमंडळात बसला आहे. त्याला काढणार का, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावरील चित्रपट सेन्सॉर मंडळाने रोखून धरला. काही ब्राम्हण संघटनांनी विरोध करून गोंधळ केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संघटनांला तंबी द्यायला हवी. महात्मा फुले यांचे विचार महाराष्ट्रात का अडवता, असा प्रश्न करुन राऊत यांनी हा फुले विरुद्ध फडणवीस वाद असल्याचा उल्लेख केला. मुंबईसह राज्यातील शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाईमागे सत्ताधारी काहीतरी डाव शिजवत असल्याची साशंकता त्यांनी व्यक्त केली.