नाशिक: अहमदनगर येथे एक कोटीच्या लाचेची रक्कम हाती पडल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (मऔविम) एका अभियंत्याने दुसऱ्या सहकारी अभियंत्याकडे भ्रमणध्वनीवरुन तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले, अशा शब्दांत भावना व्यक्त केली. उभयतांमधील संभाषणाचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी येथे सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सध्या दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जात आहे. त्या अंतर्गत राज्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. लाच घेणे व लाच देणे हे दोन्ही गुन्हे आहेत. सामाजिक प्रगतीत भ्रष्टाचार हा मुख्य अडथळा आहे. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती आणि विभागाकडून प्रभावीपणे कारवाई केली जात असल्याचे नांगरे पाटील यांनी नमूद केले. मागील १० महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात ७०० सापळा कारवाई, अपसंपदेचे १५ जणांविरुध्द आठ गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचाराच्या तीन गुन्ह्यांत ४३ जणांवर कारवाई केली. यात नाशिक विभाग आघाडीवर आहे.

हेही वाचा… लाच स्वीकारताना शिरपूर तालुक्यात मंडळ अधिकाऱ्यास अटक

या विभागाने जनजागृती सप्ताहात अहमदनगर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (मऔविम) सहायक अभियंता अमित गायकवाड आणि तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ (सध्या धुळे येथे कार्यकारी अभियंता) अशा दोघांवर कारवाई केली. तक्रारदार हा शासकीय ठेकेदार आहे. मूळा धरण ते टेहेरे या भागातील जल वाहिनी कामाचा ३१.६७ कोटींचा ठेका त्याला मिळाला होता. या कामासाठी ९४ लाख सुरक्षा रक्कम आणि एक कोटी ६८ लाख रुपये अनामत रक्कम ठेवली होती. काही कामाचे देयक प्रलंबित आहे. ते मिळवून देण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी संशयितांनी तक्रारदाराकडे एक कोटींची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीचा प्रयत्न करूनही संशयितांनी रक्कम कमी केली नाही. तडजोडीवेळी झालेल्या संभाषणाचे पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. एक कोटीची रक्कम सहायक अभियंता अमित गायकवाडने अहमदनगर येथे स्वीकारली. नंतर कार्यकारी अभियंता वाघशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. तेव्हा एकाने तुझ्या कष्टाचे चांगले फळ मिळाले… अशा शब्दात भावना व्यक्त केली. त्यानंतर क्षणार्धात गायकवाडला पथकाने रंगेहात पकडले. यातील वाघ हा संशयित अभियंता फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahmednagar 1 crore bribe case vishwas nangre patil said investigation agency has the evidence of the conversation between two accused dvr