नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे गारूड आजही महाराष्ट्रावर कायम आहे. त्यांच्या ठाकरे शैलीतील खास भाषणांचे आजही दाखले दिले जातात. सद्यस्थितीत राजकारणाची खालावत चाललेली पातळी, राज्यातील राजकीय प्रयोग यावर कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करत बाळासाहेबांच्या भाषणाची चित्रफित निर्धार शिबिरात दाखविण्यात आली. त्यास उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा घेत बाळासाहेब ठाकरे यांचे आजच्या राजकीय स्थितीवर भाष्य, खचलेल्या शिवसैनिकांना धीर देण्यासाठी खास चित्रफित तयार करण्यात आली. पाच ते सात मिनिटांची ही चित्रफित शिबीर समारोपाआधी दाखविण्यात आली. यामध्ये बाळासाहेबांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. माझ्या तमाम हिंदु बांधवांनो, असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांना साद घातली.

राज्यात शिंदे गटाकडून झालेली गद्दारी असो वा शिवसेनेमध्ये अंतर्गत स्तरावर झालेल्या बंडखोरीवर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावरही त्यांनी टिका करतांना शिवसेनेच्या दुफळीस भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला. या परिस्थितीत शिवसैनिकांनी डगमगून जाऊ नये, आपण शेवटपर्यंत लढू, असे आवाहन त्यांनी केले.