नाशिकपासून इतर शहरांशी जोडल्या गेलेल्या हवाई प्रवासी वाहतुकीस पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. फेब्रुवारीपासून एअर इंडिया नाशिक विमानळावरून देशांतंर्गत विमान सेवा सुरू करणात येणार आहे. गेल्या महिन्यात नाशिक विमानतळ ‘एआयपी’ नकाशावर येण्यासाठीची आवश्यक परवानगी मिळाल्यामुळे या विमानतळावरून देशांतंर्गत हवाई प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

दोन जानेवारी २०१२ रोजी नाशिकपासून सुमारे १५ किलोमीटरवरील ओझर येथे नाशिक विमानतळाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीचे काम पूर्ण होऊन तीन मार्च २०१४ रोजी इमारतीचे उद्घाटन झाले. विमानतळ हस्तांतराच्या वादामुळे इमारतीचे उद्घाटन होऊनही कित्येक दिवस विमान सेवा सुरूच झाली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येण्याची शक्यता लक्षात घेत खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारने प्रारंभीच्या काही दिवसांसाठी स्वीकारली.

या वर्षी नाममात्र दराने राज्य शासनाने विमानतळ एचएएलकडे हस्तांतरीत केल्यानंतर विमानतळ एआयपी नकाशावरच नसल्याने त्यास
नागरी हवाई खात्याकडून परवानगी मिळत नसल्याचे समोर आले. या परवानगीसाठी स्थानिक उद्योजक तसेच एचएएलच्या अधिकाऱ्यांसह खा. गोडसे यांनी प्रयत्न केल्याने गेल्या महिन्यात नागरी हवाईच्या महासंचालकाकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे विमानतळ एआयपी नकाशावर आले.

यानंतर प्रत्यक्ष विमान सेवा सुरू होण्यासाठी गोडसे यांनी दिल्लीत एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांच्याशी बोलणी केली. ही बोलणी यशस्वी झाल्याने फेब्रुवारीपासून एटीआर ७२-६०० या विमानाव्दारे नाशिक-मुंबई व इतर शहरे अशी सेवा सुरू करण्याची तयारी एअर इंडियाने दर्शविली असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

Story img Loader