राघवेंद्र व सुषमा देसाई यांचे संशोधन
डिझेल वाहनांतून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड या प्रदूषणास हातभार लावणाऱ्या वायूंचे प्रमाण वैशिष्टय़पूर्ण रासायनिक द्रव पदार्थाने ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असल्याचे संशोधन येथील ज्येष्ठ अभियंते राघवेंद्र देसाई आणि रसायनशास्त्रात शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पत्नी सुषमा यांनी केले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील बहुतांश शहरे सध्या प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरत आहेत. या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यास अत्यल्प खर्चात हा रासायनिक द्रव पदार्थ सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा आहे. प्रदूषण कमी व्हावे म्हणून सरकारला हे संशोधन मोफत देण्याची त्यांची तयारी आहे.
पुण्याच्या किर्लोस्कर ऑइल कंपनीत ४० वर्षे सेवा बजावणारे राघवेंद्र देसाई (७५) आणि त्यांच्या पत्नी सुषमा (७०) यांनी निवृत्तीनंतर या अनुषंगाने प्रयोग हाती घेतले. २००५ मध्ये दुचाकी व तीन चाकी (पेट्रोल) वाहनांवर त्यांनी प्रथम असा प्रयोग केला होता. ‘सायलेन्सर’मधून बाहेर पडणारा धूर विशिष्ट रासायनिक पदार्थाच्या द्रव्यातून प्रवाहित केल्यास घातक वायूचे प्रमाण कमी करता येते, हे त्यांनी दाखविले. त्या वेळी मोपेड लुना, स्कूटी, मोटार सायकल, रिक्षा, स्कूटर या वाहनांवर चाचणी घेण्यात आली. पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीद्वारे त्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्याबाबत जनजागृतीचा प्रयत्न दाम्पत्याने केला. मात्र, प्रतिसादाअभावी तेव्हापासून गुंडाळून ठेवलेल्या या विषयावर दोन वर्षांपूर्वी पुन्हा नव्याने काम सुरू केले. प्रदूषणाच्या संकटामुळे महानगरांमध्ये विशिष्ट कालमर्यादेनंतर डिझेल वाहनांची नोंदणी रद्द केली जाते. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल वाहनांमधून अधिक प्रदूषण होते. हे लक्षात घेत डिझेल वाहनांसाठी नव्याने संशोधन सुरू झाले. सहजपणे उपलब्ध असणाऱ्या रासायनिक पदार्थाच्या साहाय्याने आठ ते दहा प्रयोगांनंतर द्रव पदार्थाचे हे संशोधन प्रत्यक्षात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
टाटा मॅजिक या डिझेल मोटारीवर त्याची चाचणी घेण्यात आली. एरवी वाहनातून बाहेर पडणारे वायू आणि ‘सायलेन्सर’ला प्रदूषण नियंत्रण यंत्रणा जोडून बाहेर पडणाऱ्या वायूचे प्रमाण यांचा प्रयोगशाळेत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. चाचणी अहवालातून मोटारीमधून बाहेर पडणारा धूर संशोधित द्रव पदार्थातून प्रवाहित केल्यास घातक वायूंची
मात्रा कमी झाल्याचे समोर आले. धुरातील वायू रासायनिक पदार्थात विघटन पावतात आणि उत्सर्जित होणाऱ्या वायूत ऑक्सिजनची मात्रा वाढत असल्याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.
‘एआरएआय’मध्ये पडताळणी करावी
देशातील डिझेल वाहनांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या संशोधनाची माहिती दाम्पत्याने पंतप्रधान कार्यालयापासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ई-मेलद्वारे पाठविली आहे. शासनमान्य खासगी प्रयोगशाळेतून प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या चाचणीत समोर आलेल्या निष्कर्षांची पुणे येथील भारतीय ऑटोमोटीव्ह संशोधन असोसिएशनच्या (एआरएआय) प्रयोगशाळेतही पडताळणी करावी, अशी देसाई दाम्पत्याची अपेक्षा आहे. या प्रयोगशाळेत बडे वाहन उद्योग त्यांच्या उत्पादनांशी संबंधित तत्सम चाचण्या करू शकतात. वैयक्तिक पातळीवर उपरोक्त चाचण्या प्रचंड खर्चीक आहेत. केंद्र व राज्य सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी या नियंत्रण यंत्रणेची कार्यक्षमता जोखून त्याची डिझेल वाहनांमध्ये अंमलबजावणी करावी, अशी मागणी या दाम्पत्याने केली आहे.